चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड   

वाहतूक थांबविण्याची मागणी

राजगुरूनगर, (वार्ताहर) : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान धरणाच्या जवळ असणार्‍या भीमा नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊन पर्यटक अथवा पुलावरुन वाहतूक करणार्‍यांच्या जिविताला मोठा धोका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुलावरील वाहतूक थांबविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
 
चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर येथे मोठ्या संखेने पर्यटक येत असतात. या पुलावरून वर्षाविहार करण्यासाठी पावसाळ्यात गर्दी होत असते. यातच पूल वाहतुकीस धोकादायक झाला असूनही या पुलावावरून वाहतूक सुरूच आहे.सुमारे अठरा वर्षांपूर्वी या पूलाचे बांधकाम करण्यात आले असून आताच्या या परिस्थितीमुळे पुलाचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. या पुलाचे लोखंडी कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. 
 
पुलाच्या भगदाडाला अडखळून अपघात होऊ नये म्हणून, स्थानिक ग्रामस्थांनी झाडाच्या फांद्या व दगड आजूबाजूला ठेऊन वाहनांना धोक्याची जाणिव करुन दिली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील कहु, कोयाळी, चिखलगांव, वेताळे, सायगाव, साकुर्डी आदी गावांना जोडणारा हा मार्ग आहे. परंतु पुलाला पडलेल्या भगदाडामुळे येथील वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

Related Articles