संस्थाचालकाच्या अटकेच्या मागणीसाठी मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे आंदोलन   

पुणे : बावधन येथील रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेचे अध्यक्ष सूरज शर्मा याच्यावर महिला कर्मचारी यांचा विनयभंग, अश्लील वर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. संबंधित पीडित तरुणीने तक्रार दाखल करूनही पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल न केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक आंदोलन करत शर्मावर तात्काळ करावाई करावी, अशी मागणी केली.
 
आरोपी संस्थाचालक सूरज शर्मा याने संघ सहलीच्या नावाखाली महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना फार्महाऊसवर नेऊन गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. विरोध केल्यानंतर एका तरुणीला कामावरून काढून टाकण्यात आले व तिला धमक्या देण्यात आल्या. ९ जून रोजी गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. उलट भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यावर पीडितेवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
 
पीडितेला न्याय मिळेपर्यंत आणि हे महाविद्यालय बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी दिला. शहर सचिव राम बोरकर, राज्य संघटक प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी रुपेश घोलप, अभिषेक थिटे, विक्रांत भिलारे, परिक्षीत शिरोळे, सचिन ननावरे, प्रवीण कदम, सागर कुलकर्णी, निलेश जोरी, केतन डोंगरे, आशुतोष माने आदी पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
सूरज शर्मा व त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करावी
इन्स्टिट्यूटमधील महिला स्टाफ व विद्यार्थिनींची चौकशी करावी
पीडित तरुणीला पोलिस संरक्षण द्यावे
तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणणार्‍या राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांवर कारवाई करावी.

Related Articles