पुणे : मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौकात दुचाकीला धडक देऊन सहप्रवासी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मालमोटारचालकाने अपघातापूर्वी मद्यसेवन केले होते का? हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. तसेच, दोघांची एकत्रित पोलिस चौकशी करायची आहे, असे तपास अधिकार्यांनी न्यायालयास सांगितले. त्यानंतर न्यायालयाने चालक आणि मालकाची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. मालमोटारचालक शौकतअली पापालाल हुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ, कोंढवा) आणि मालक गोकुळ चंद्रकांत जवळकर (वय ४२, रा. मोहनननगर) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपी चाल आणि मालकाची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन कायद्याच्या कलमांनुसार मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगाधाम चौकात ११ जूनला हा अपघात घडला. या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. गंगाधाम चौक ते आईमाता रस्त्यावर सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत अवजड वाहतुकीला मनाई असतानाही मालक जवळकरने या रस्त्यावरून अवजड मालमोटार चालविण्यास सांगितल्याची कबुली चालक शौकतअलीने दिली आहे. चालकाने मद्याचे सेवन केले आहे का, याची तपासणी करणारा अहवाल प्रयोगशाळेकडून मिळवायचा आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी देण्याची तपास अधिकारी निरीक्षक सुनीता नवले आणि सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली.
Fans
Followers