ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने   

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात देशभर निदर्शने सुरू आहेत. ‘नो किंग्ज’ नावाचे फलक हातात घेऊन नागरिक ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाची सुरुवात कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस शहरापासून झाली होती. आता हे आंदोलन संपूर्ण अमेरिकेत पसरले आहे.  
 
व्हाईट हाऊसच्या बेकायदा स्थलांतरितांसंदर्भातील धोरणाविरोधात अमेरिकेत संतापाची लाट पसरली आहे. न्यूयॉर्क, डेन्व्हर, शिकागो, ऑस्टिन आणि लॉस एंजेलिससह अन्य राज्यांमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ‘नो किंग्ज’चे फलक झळकावत ते ट्रम्प यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत. लॉस एंजेलिस शहरातील आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी यूएस नॅशनल गार्ड तैनात केले गेले. ज्यामुळे निदर्शक आणखी संतप्त झाले असून, ट्रम्प प्रशासनावर हुकूमशाही राबविल्याचा आरोप केला जात आहे.
 
अटलंटा शहरात जवळपास पाच हजार निदर्शकांनी एकत्र येत नो किंग्ज  फेरी काढली. फिलाडेल्फियाच्या लव्ह पार्कमध्ये हे रस्ते कोणाचे? हे रस्ते आमचे, अशी घोषणाबाची निदर्शक देत होते. अनेकांनी ट्रम्प यांची प्रतिकृती असलेल्या बाहुल्याही दाखविल्या. वॉशिंग्टन डिसीमध्ये लष्कराच्या वर्धापन दिनाची परेड असल्यामुळे तिथे निदर्शने करण्यात आली नाहीत. मात्र, देशभरात जवळपास दोन हजार ठिकाणी निदर्शने करण्यात आली. हॉलिवूडमधील अनेक अभिनेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. ते ट्रम्प यांच्या धोरणांना, विशेषतः बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या त्यांच्या कठोर कारवाईला विरोध करण्यासाठी आग्रेसर आहेत. अमेरिकेत आता बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धचा संघर्ष शिगेला पोहचला आहे.
 

Related Articles