हिंजवडी पुन्हा एकदा जलमय   

मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीनतेरा

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात शुक्रवारी आणि शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे आयटीयन्स वाहतूक कोंडीत अडकून पडले. हिंजवडीतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. विशेषतः फेज एक आणि फेज दोन परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे आयटी कर्मचार्‍यांना रात्री घरी परतताना त्रास सहन करावा लागला. चारच दिवसांपूर्वी प्रशासनाच्या संयुक्त बैठकीनंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
 
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या तासाभराच्या पावसाने रस्त्यांवर पाणी तुंबले. ज्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात अडकली. काही ठिकाणी पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत पोहोचली होती. ड्रेनेज व्यवस्था आणि नालेसफाईच्या अभावामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. गेल्या आठवड्यातही याच परिसरात पावसामुळे वाहतूक ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
 
अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रस्त्यावर साचून राहिले. रस्त्यावरती खड्डे झालेली दुरावस्था यामुळे रस्ता ओलांडणे देखील वाहचालकांना अवघड बनले. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली. सायंकाळी कंपन्या सुटण्याच्या वेळी हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सत्ताव्यक्त केला.
 
अखेर पालकमंत्र्यांनी घातले लक्ष
 
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा अनुषंगाने आयोजित बैठकीत प्रामुख्याने हिंजवडीच्या विषयावरती लक्ष वेधण्यात आले. स्थानिक प्रशासनाच्या विरोधातदेखील नाराजी व्यक्त केली. माण-हिंजवडी आयटी पार्क परिसरातील समस्या व उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला गेला व संबंधित विभागांना योग्य ते निर्देश देण्यात आले.
 
पीएमआरडीए, एमआयडीसी अधिकारी निर्धास्त
 
हिंजवडीच्या समस्येवरती विविध विभागाच्या एकत्रित बैठक घेऊन या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार होते. त्यासाठी पाच दिवसाचा कालावधी दिला होता. मात्र, या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे कामे झाले दिसून आले. मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा हिंजवडी परिसराची दाणादाण उडाली. याबाबत एमआयडीसी आणि पीएमआरडी दोन्ही विभाग मात्र निर्धास्त असल्याचे दिसले.

Related Articles