आकुर्डी गावठाणात अतिक्रमणावर पालिकेची कारवाई   

पिंपरी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डी गावठाणातील विठ्ठल मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक रस्ते, मंदिर परीसर व वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या अनधिकृत टपर्‍या, पत्र्याचे शेड यावर जेसीबी व गॅस कटरच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
 
आषाढी एकादशीच्या दिवशी या भागातून हजारो भाविकांची वारी विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून ही कारवाई महत्त्वाची ठरली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्थानिक पोलीस बंदोबस्तासह शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत कारवाई सुरळीत पार पाडली. अनेक स्थानिकांनी या मोहिमेचे स्वागत केले. ’दरवर्षी अतिक्रमणांमुळे पालखी मार्गावर चालणेही कठीण होते. यंदा महापालिकेने वेळेवर हस्तक्षेप करून योग्य निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली.
 
महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, ही कारवाई केवळ आकुर्डीपुरती मर्यादित नसून, अन्य अतिक्रमित भागांमध्येही येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई एकदाच न करता सातत्याने व्हावी आणि सार्वजनिक जागांचा वापर नागरी सुविधांसाठीच व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अशा नियोजनबद्ध कारवायांमुळे भाविकांच्या सुरक्षेला आणि वाहतुकीस पूरक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Related Articles