इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला   

चार जणांचा मृत्यू, ४१ पर्यटकांना वाचविले; १८ जखमींवर उपचार सुरु 

पिंपरी : मावळात इंदोरीतील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल रविवारी दुपारी कोसळला. यात चार पर्यटकांचा मृत्यू झाला. तर, पाण्यात बुडालेल्या ४१ पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यापैकी १८ जण जखमी असून, सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. तळेगाव दाभाडेनजिक घडलेल्या या दुर्घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. वाहून गेलेल्या पर्यटकांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. चार मृत पर्यटकांपैकी तिघांंची ओळख पटली आहे. रोहित माने (वय ३५), विहान माने (वय ५, दोघे रा. उजळायवाडी, कोल्हापूर), चंद्रकांत साठले (वय ६५, हडपसर, पुणे) अशी नावे आहेत.
 
इंदोरीत कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर जुना लोखंडी पादचारी पूल आहे. १९९३ मध्ये तो उभारला होता. कुंडमळा ओलांडण्यासाठी या पादचारी पुलाचा वापर केला जात होता. दुचाकीही त्यावरुन जात होत्या. हा पूल अतिशय जीर्ण झाला होता. लोखंडी ढाच्यावर हा सिमेंटचा पूल उभा होता. एका बाजूने एकच दुचाकी येऊ शकते, एवढीच पुलाची क्षमता आहे. रविवारची सुटीचा आनंद लुटण्यासाठी  असल्याने कुंडमळा सुमारे १०० पर्यटक आले होते. ६० पर्यटक पुलावर उभे होते. तेवढ्यात दोन्ही बाजूने दुचाकी आल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल कोसळला. त्यामुळे पुलावरील पर्यटक इंद्रायणी नदीतील पाण्यात पडले आणि वाहून गेले.
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिस, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल, पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीएचा अग्निशमन विभाग, ग्रामस्थ, आपदा मित्र, शिवदुर्ग संघटनांनी बचाव कार्य सुरू केले. सायंकाळी सात वाजेपर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाण्यात बुडालेल्या ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आले. १८ जण जखमी असून त्यातील सहा पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सोमटाणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शेलारवाडीच्या दिशेने रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे शोधकार्य सुरू होते.

महाजन यांची घटनास्थळी भेट

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार, आमदार सुनील शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड या वेळी उपस्थित होते.

सहा महिन्यांपूर्वी एकाचा मृत्यू

सहा महिन्यांपूर्वी या पुलावरून दुचाकी पडून एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या विनंतीनुसार रोटरी क्लबने जाळी बसवून दिली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. इंद्रायणी नदीच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या लोकवस्तीमधील नागरिकांना रहदारीसाठी हा एकच पूल आहे. केवळ एक दुचाकी जाईल एवढीच जागा असताना पर्यटक दोन्ही बाजूने वाहने घेऊन जातात. नदी पात्रातील पुलावर ते छायाचित्र काढण्यासाठी थांबतात. जीर्ण झालेल्या पुलावर अनेकजण थांबल्याने पूल कोसळला. पर्यटक नदीत पडल्याचे दिसल्याने आम्ही काही जणांना पाण्यातून बाहेर काढल्याचे शेलारवाडी गावातील काही तरुणांनी सांगितले. 
 
या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. तरी देखील दुरुस्तीचे काम झाले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

घटना अतिशय दुर्दैवी : खासदार श्रीरंग बारणे

कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे. पूल जीर्ण झाला होता. असे जीर्ण पूल तातडीने दुरुस्त करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. खासदार बारणे म्हणाले, कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळला होता. जीर्ण पुलाबाबत दोन दिवसांपूर्वीच मावळातील प्रशासनासोबत बैठक घेतली होती. पर्यटन स्थळावर अधिकचा बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मावळात मोठी पर्यटन स्थळे आहेत. अनेक ठिकाणच्या पुलांची दुरवस्था झाली आहे. तातडीने ते दुरुस्त करावेत. जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. सोमटाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
 
 तिघांचा मृतदेह सापडले आहेंत. ४१ जणांना नदीतून बाहेर काढले आहे. अजूनही शोधकार्य सुरू आहे. तसेच मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त 

पंतप्रधानांकडून दखल

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेची दखल पंतप्रधान नरेंंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. त्यांनी मुख्यमंत्री देवे्ंरद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे पाच लाखाची मदत जाहीर झाली आहे.
 

 

Related Articles