श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता   

मंदिर समितीला पूजेतून ३५ लाख रूपयांचे उत्पन्न   

सोलापूर, (प्रतिनिधी) : ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून पासून सुरुवात करण्यात आली होती.  मंदिर समितीचे सदस्य व अधिकारी यांच्या शुभहस्ते सांगता पुजा करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
 
श्री विठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यात येते. या चंदनउटी पुजेची सांगता पुजा झाली. त्यामध्ये श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पुजा अनुक्रमे सदस्या ड माधवीताई निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे, सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व पांडूरंग दशपुत्रे उपस्थित होते.
  
यंदा प्रथमच, भाविकांना श्रींची चंदनउटी पुजा ऑनलाईन पध्दतीने बुकींग करण्यास उपलब्ध करून दिली होती. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पूजेच्या माध्यमांतून मंदिर समितीला सुमारे ३५ लक्ष १३ हजार इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेकडे अनुक्रमे रूपये २१ हजार व ९ हजार इतके देणगी मुल्य होते. ३० मार्च ते १३ जून कालावधीत एकूण पुजेचे ७६ दिवस उपलब्ध झाले होते. त्यामध्ये श्री विठ्ठलाकडे १२१ व रूक्मिणीमातेकडे १०८ पुजा उपलब्ध झाल्या होत्या. यापूजेसाठी अंदाजे ९० ते ९५ किलो चंदनाचा वापर करण्यात आला आहे.  याशिवाय, चंदनउटी पुजेच्या सांगतानिमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे २ हजार ते अडीच हजार भाविकांनी लाभ घेतला.

Related Articles