उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत   

मुंबई, (प्रतिनिधी) : मराठी माणसाला न्याय मिळावा, मुंबईत मराठी माणूस टिकावा, ही शिवसेनेची आणि राज ठाकरे यांचीही भूमिका आहे. त्या भूमिकेतून एकत्र येण्याचा विचार राज ठाकरे यांनी मांडला आणि उद्धव ठाकरेंनी त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या एकत्रिकरण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत आशावादी आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही याच भूमिकेत राहू, असे शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले. 
 
ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा चालू असतानाच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. नेमकी चर्चा काय झाली हे उघड झाले नसले तरी या भेटीमुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येण्याला खिळ बसणार असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ते दोघेही वेगळ्या विषयासंदर्भात भेटले असू शकतात. त्यामुळे वेगळ्या शंका घेऊन मूळ मुद्यांना बगल देणे योग्य नाही. फडणवीस हे गौतम अदानी किंवा मुंबईतील उद्योगपती, बिल्डर यांचे समर्थक आणि मुख्य हस्तक आहेत. त्यांनी कितीही भेटीगाठी घेतल्या तरी फरक पडत नाही. 
 
मुंबई ही परप्रांतीय उद्योगपती गिळत असतील आणि  त्याला भाजप, शिंदे सारखे लोक मदत करीत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी, महाराष्ट्रभिमान्यांनी एकत्र यावे ही शिवसेनेची भूमिका कायम आहे, असे सांगतानाच भाजप आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस व महाराष्ट्राचे शत्रू आहेत हे लोकांनी ठरवले आहे, असा आरोप करत राऊत यांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles