केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले   

सात जणांचा मृत्यू; दोन महाराष्ट्रातील

रुद्रप्रयाग : उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिर परिसरात रविवारी हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील भाविकांचा समावेश आहे. खराब हवामान आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे ते कोसळल्याचे सांगण्यात आले.रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंग राजवाड यांनी पीटीआयला सांगितले की, जंगलातील गौरीकुंड परिसरात अपघ़ात झाला. मृतांमध्ये पाच भाविक, वैमानिक आणि बद्रिनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या एका कर्मचार्‍याचा समावेश आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ येथून सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गुप्तकाशीकडे उड्डाण केले. यानंतर काही वेळात ते कोसळले. अपघातस्थळाचे नाव गौरी माई खारक, असे असून ते गौरीकुंड पासून सुमारे ५ किलोमीटर उंचीवर आहे.
 
सूत्रांनी सांगितले की, आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंंपनीच्या मालकीचे हेलिकॉप्टर होते. ते गौरीकुंड आणि केदारघाटी दरम्यान त्रिजुगीनारायण कोसळून पेटले होते. राजवाड यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले आहे. घटनास्थळी मदत पथके पाठवली आहेत. 
 
दरम्यान, अहमदाबाद येथे लंडनला जाणार्‍या एअर इंडियाचे विमान कोसळले होते. त्यात विमानातील २४१ जणांचा आणि अन्य जणांचाा मृत्यू झाला होता.  ही घटना ताजी असताना हेलिकॉप्टर कोसळले आहे. या पूर्वी आठ  मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात ंगंगोत्री धाम परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 
 
सात जून रोजी केदारनाथ परिसरात उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे वैमानिकाला हेलिकॉप्टर तातडीने उतरावे लागले होते. त्यात वैमानिक  जखमी झाला होता. पाच भाविकांची सुटका करण्यात यश आले होते.
 
दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यानी राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाला अणि अन्य संस्थांना मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील पोस्ट त्यांनी एक्सवर टाकली. दुर्घटनेच्या कारणाचा तपास करण्यास सांगितले आहे. पर्वतीय भागांत उड्डाण करणार्‍या प्रत्येक हेलिकॉप्टरची मानक कार्यपद्धतीनुसार तांत्रिक तपासणी करण्याच आदेश दिले आहेत. 
 
राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री धामी यांनी काल दिली. त्याद्वारे तांत्रिक बिघाड शोधून पर्वतीय भागांतील भविष्यातील अपघात रोखण्याच्या उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. तसेच त्यांनी उच्चस्तरीय समिती चौकशीसाठी स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत.  त्याद्वारे आजपर्यंतच्या अपघातांचा मागोवा घेऊन ते टाळण्यासाठी शिफारसी करण्यास सांगितले आहे. अपघातातील दोषींवर त्याद्वारे कारवाई केली जाणार आहे.  

मृतांमध्ये वणीतील जयस्वाल कुटुंब

जिल्हा पर्यटन विकासचे अधिकारी आणि हेली सर्व्हिसचे नोडल अधिकारी राहुल चौबे म्हणाले, काल पहाटे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहीम तातडीने राबविण्यात आली. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार्‍यांमध्ये महाराष्ट्रातील श्रद्धा राजकुमार जयस्वाल (वय ३५) आणि काशी (वय २), गुजरातचे राजकुमार सुरेश जयस्वाल (वय ४१),उत्तराखंडचे विक्रम सिंह रावत, उत्तर प्रदेशचे विनोद देवी (वय ६६), तृष्टी सिंह (वय १९) आणि वैमानिक कॅप्टन रणवीर सिंह चौहान यांचा समावेश आहे. 

चारधाम यात्रा दोन दिवस बंद

केदारनाथ परिसरात हेलिकॉप्टर दुर्घढनेमुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबीला राज्य सरकारने दुजोरा दिला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत भाविकांचा मृत्यू झाल्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून यात्रा तूर्त स्थगित केली जात असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
 

Related Articles