अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ   

पुणे : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित पुणे मॉडेल स्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करण्यास उभे राहताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पवारांनी कार्यकर्त्यांचे बोलणे शांत ऐकून घेत उत्तर दिले. तरीही कार्यकर्ते सभागृहाबाहेर जात नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर नेले. यावेळी सभागृहात काही मिनिट गोंधळाचे वातावरण होते.
 
राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी म्हणून माजी मंत्री बच्चू कडू गेल्या ४ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या मान्य होणार किंवा नाही सरकारकडून काय पाउले उचलली जात आहेत. या सदंर्भात प्रश्न उपस्थित करून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कार्यक्रमात घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात सुरुवात केली असता अजित पवारांनी कार्यकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडून घ्यावे म्हणून त्यांना सोडण्यास सांगितले. पवार यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देखील त्यांच्या आंदोलनाबाबत लक्ष ठेऊन आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अखेर पवारांनी पोलिसांना आदेश देत कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर नेण्याचे आदेश दिले. 
 
आम्ही शेतकर्‍यांचे पुत्र आहोत. काल मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवून चर्चा केली आहे. लवकरच याबाबत राज्य सरकार समिती स्थापन करत आहे. समितीत बच्चू कडू यांचा समावेश असेल. काही गोष्टींचा चर्चेतून मार्ग निघत असतो. समंजस भूमिका घेतली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात सांगितले.

Related Articles