शुभांशूंची अभिमानास्पद भरारी   

अजय तिवारी

शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. ४१ वर्षांनी भारत पुन्हा एकदा एका भारतीयाला मानवयुक्त मोहिमेअंतर्गत अंतराळात पाठवत आहे. या मोहिमेतून देश काय साधणार आहे? त्याचा देशाला आणि एकूणच अंतराळ विज्ञानाला भविष्यात कसा फायदा होणार आहे? भारतासाठी अभिमानास्पद असलेल्या या मोहिमेचा मागोवा.
 
गेल्या दोन-तीन दशकांमध्ये भारताचा अंतराळ कार्यक्रम त्याच्या आर्थिक प्रगतीमुळे ठळकपणे दिसू लागला. अंतराळ तंत्रज्ञानात जास्तीत जास्त स्वयंपूर्णतेची आपली भूमिका राहिली. भारत आपल्या अंतराळ संशोधनाला राष्ट्रीय मानबिंदूंशी जोडतो. भारताने २०२३-२४ मध्ये एकूण ११ कृत्रिम आणि इतर देशांचे नऊ उपग्रह प्रक्षेपित केले. २० उपग्रह एकाच अग्निबाणाने प्रक्षेपित करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. उपग्रह प्रक्षेपणाखेरीज भारतवंशीय महिला अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात नऊ महिन्यांहून जास्त कालावधीचा मुक्काम केल्यानंतर पृथ्वीवर परतल्या होत्या. त्यानंतर गेले काही दिवस भारतीय ज्या सुवर्णक्षणाची वाट पहात होते, तो अवतरला.
 
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांना घेऊन ऑक्सिऑम चार मोहिमेअंतर्गत फाल्कन रॉकेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासासाठी अवकाशाच्या दिशेने बुधवारी रवाना झाले. या पथकाचे नेतृत्व अनुभवी कमांडर पॅगी व्हिटसन करत असून त्यांच्यासोबत हंगेरीचे टिबोर कपू आणि पोलंडचे स्लोव्होज विस्निव्हस्की हे अन्य तज्ज्ञ अंतराळवीर आहेत. त्यांच्यासह भारतीय हवाई दलाचे पायलट, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार्‍या ऑक्सिऑम मिशन ४ (एक्स-४) चा भाग म्हणून स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. ते १४ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळात गेले आहेत. ते या मोहिमेचे पायलट असून २५ जून २०२५ रोजी १२ वाजून ०१ मिनिटांनी ड्रॅगन यशस्वी प्रक्षेपित होऊन अंतराळात स्थिरावले आहे.

शेतीवरील प्रयोग

हे मिशन एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण, शुभांशू अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आणि आयएसएसला भेट देणारे पहिले व्यक्ती आहेत. ऑक्सिऑम मिशन ४ ही आयएसएसची खासगी अंतराळवीर मोहीम आहे. त्यांचे हे उड्डाण देशाच्या अंतराळ इतिहासातील एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. या मोहिमेमुळे भारत अवकाशजगात पुन्हा निर्णायक भूमिकेत येईल. या मिशनसाठी इस्रोने अंदाजे ५५० कोटी रुपये खर्च केले असून शुभांशू अंतराळ स्थानकात सात स्वतंत्र वैज्ञानिक प्रयोग पार पाडणार आहेत. यामध्ये भारतीय सूक्ष्म गुरुत्व प्रयोग, कडधान्यांच्या अंकुरण प्रक्रियेचा अभ्यास, मानवी पेशींवर गुरुत्वहीनतेचा प्रभाव तसेच भात, टोमॅटो आणि वांग्याच्या बियाण्यांवर गुरुत्वशून्य वातावरणाचा परिणाम यांचा समावेश आहे.
 
शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे एक सन्मानित चाचणी पायलट आहेत. त्यांना २००० पेक्षा जास्त तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. ते १७ जून २००६ रोजी हवाई दलाच्या लढाऊ क्षेत्रात सामील झाले. त्यांनी सुखोई-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एन-३२ यांसह विविध विमाने उडवली आहेत. ते आता अंतराळात जाणारे पाचवे भारतीय बनले आहेत. गगनयान मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या प्रमुख दावेदारांपैकी ते एक आहेत. १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनौ येथे जन्मलेल्या शुक्लांनी पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकादमीतून पदवी प्राप्त केली, तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतले. २०१९ मध्ये त्यांनी रशियातील गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण घेतले.
 
१९८४ मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक उड्डाणानंतर ४१ वर्षांनी भारत पुन्हा एकदा एका भारतीयाला मानवयुक्त मोहिमेअंतर्गत अंतराळात पाठवत आहे. या मोहिमेबद्दल शुभांशू शुक्ला अभिमानाने म्हणतात, ‘मी राकेश शर्माजींबद्दल शाळेच्या पुस्तकांमध्ये वाचले होते, त्यांच्या अनुभवांमुळे मला प्रेरणा मिळाली. आज मीही त्या मार्गावर आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे.’ राकेश शर्मा यांनी ३ एप्रिल १९८४ रोजी सोयुझ टी-११ अंतराळयानातून मोहीम पार पाडली होती. ही सोव्हिएत युनियनसोबतची संयुक्त मोहीम होती, ज्यामध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय बनले. आपल्या या आव्हानात्मक मिशनबद्दल आनंद व्यक्त करताना शुभांशू शुक्ला म्हणाले, ‘भारतातील लोकांसोबत आपले अनुभव वाटण्यासाठी मी तयार आहे. देशाच्या विविध भागांमधून सांस्कृतिक वस्तू अंतराळात घेऊन जाण्याची माझी योजना आहे. अंतराळ स्थानकात मला योगमुद्राही करायची आहे. राकेश शर्मा यांच्या अंतराळ सफरीच्या अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच भारतीय पायलट आयएसएसवर मिशन करत आहे. हे जागतिक स्तरावर भारताच्या अंतराळ सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. आयएसएसवरील वास्तव्यात, शुक्ला किमान सात वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये अवकाशात मानवी जीवनाची शाश्वतता, अवकाश उड्डाणाचा पिकांवर होणार्‍या परिणामाचा तपास, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील टार्डिग्रेड्सचा अभ्यास करणे आणि अवकाशात पिके वाढवण्याच्या व्यवहार्यतेचा शोध घेणे समाविष्ट आहे. त्या दृष्टीने चाचण्या घेण्यात येतील.

महत्त्वपूर्ण संशोधन

या मोहिमेत अंतराळातील पिकांच्या उगवणीसाठी महत्त्वाचे संशोधन करण्यात येणार आहे. त्यामुळे भारत केंद्रित अंतराळ शेती आणि भविष्यातील अंतराळ संशोधनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या मोहिमेसाठी ५४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नासा आणि इस्रोच्या या संयुक्त मोहिमेत अंतराळात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात येणार आहे. शुभांशू अंतराळातील मानवी आरोग्य आणि जीवांवर होणारा परिणाम याचा अभ्यास करणार आहे. पृथ्वीवरून अंतराळात अन्न पाठवणे खर्चिक आणि कठीण काम असते. त्यामुळे अंतराळात अन्न निर्मितीसाठी या मोहिमेत प्रयोग केले जाणार आहेत. यामध्ये मूग आणि मेथी पिकांवर अभ्यास करण्यात येणार आहे. भारतीयांच्या स्वयंपाकात मूग आणि मेथी हे महत्त्वाचे घटक मानले जातात. त्यामुळे या दोन्ही पिकांमधील पौष्टिकता आणि औषधी गुणधर्म लक्षात घेऊन अंतराळात संशोधनासाठी निवड करण्यात आली आहे.
 
भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सहा प्रकारच्या पिकांच्या बियाणांची चाचणी घेणार आहे. पृथ्वीवर परतल्यानंतर त्याच्या अनुवंशिकतेतील बदलांचे निरीक्षण करून भविष्यातील अंतराळ शेतीसाठी सर्वात योग्य गुणधर्म निवडण्यासाठी या बियाणांची लागवड करण्यात येणार आहे. या संशोधनामुळे भविष्यात मंगळ आणि चंद्र मोहिमेवर अन्न निर्मितीसाठी क्रांती घडेल, असे तज्ज्ञ सांगतात.
 
पृथ्वीच्या कक्षेत फिरणार्‍या जुन्या उपग्रहांमुळे, रॉकेटच्या भागांमुळे आणि इतर कचर्‍यामुळे अंतराळातील कचरा वाढत आहे. यामुळे भविष्यात अंतराळ मोहिमा आणि उपग्रहांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. अंतराळात राहिल्याने मानवी शरीरावर हाडे आणि स्नायू कमजोर होणे, दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे अशा प्रकारचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात, अंतराळात अन्न आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी लागते. अंतराळात वातावरणाचा (उदा. किरणोत्सर्ग) मानवी शरीरावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी अंतराळवीरांना अंतराळ स्थानकांवर वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. आपले शरीर कमी गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणासाठी बनलेले नाही. आपले स्नायू, हाडे, हृदय आणि इतर प्रणाली अवकाशात पृथ्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. त्यामुळे अंतराळात आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. कमी गुरुत्वाकर्षणाच्या दीर्घकालीन परिणामांमध्ये हाडे आणि स्नायूंचे नुकसान होते. अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे हाडांच्या वाढीच्या प्रणाली तुटतात. अंतराळवीर सामान्यतः सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात त्यांच्या शरीराला आधार देण्यासाठी काही स्नायू गटांचा वापर करत नाहीत. यामुळे कमी कालावधीत स्नायूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
इस्रोदेखील पहिल्यावहिल्या मानवासहित भारतीय अवकाश वाहनावर काम करीत आहे. ते तीन अवकाशवीरांना सात दिवसांसाठी पृथ्वीच्या नजीकच्या कक्षेत घेऊन जाईल. या अवकाशयानाचे तात्पुरते नाव कक्षीय वाहन असे आहे. या कॅप्सुलची तीन प्रवासी सोबत नेण्याची क्षमता असेल. या पहिल्या मानवसहित मोहिमेमध्ये इस्रोची स्वायत्त आणि तीन टन वजनाची कॅप्सूल दोन अंतराळवीरांसह २४८ मैल (३९९ किमी) उंचीवरून पृथ्वीची सात दिवस प्रदक्षिणा करेल. या पार्श्वभूमीवर आयएसएसची चार देशांच्या अंतराळवीरांची खासगी अंतरीक्ष मोहीम आणि त्यातील शुभांशूंचा सहभाग भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे.

Related Articles