वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच   

पाच लाखांहून अधिक वारकरी सहभागी होणार

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २१ जून रोजी पुणे शहरात मुक्कामी असणार आहेत. योग दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या पुढाकाराने ‘वारकरी भक्तीयोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात पाच लाखांहून अधिक वारकरी सहभागी होतील, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
 
महाराष्ट्र सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सुमारे पाच लाख वारकरी आणि तितकेच पुणेकर भजन, कीर्तन, प्रवचन, योगसाधना अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विद्यापीठात पूर्वतयारी बैठक पार पडली. यामध्ये ६०० हून अधिक स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते.
 
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपक्रमाचे संयोजक आणि राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. चारुशीला गायके, तसेच विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, भाग्यश्री मंठाळकर, सागर वैद्य, डॉ. नितीन घोरपडे, संगीता जगताप आणि एनएसएसचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
पाटील म्हणाले, या भक्तीयोग उपक्रमातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे आणि लोकसहभागाच्या शक्तीचे प्रत्यक्ष शिक्षण मिळेल, तसेच समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास वाटतो. वारकरी भक्ती आणि योग यांचा संगम असलेला हा उपक्रम पुणे शहराच्या इतिहासात एक आगळावेगळा उपक्रम ठरेल. राजेश पांडे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात शहरातील २०० हून अधिक महाविद्यालये, १८ स्वायत्त विद्यापीठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Related Articles