येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर   

येरवडा : गेल्या दोन महिन्यांपासून येरवडा येथील लक्ष्मीनगर, जय जवान नगरमधील परिसरातील दोन प्रमुख रस्ते अक्षरशः गटाराच्या पाण्याचे डबक्यात रूपांतरित झाले आहेत. रोज गटाराचे दूषित पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा  प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
    
जय जवान नगर परिसरात पावसाळ्यामुळे सर्व चेंबर तुंबलेले आहेत. यामुळे अनेक चेंबर मधून घाणीचे पाणीवर येत आहे.तसेच लोकांच्या दरापर्यत पाणी शिरले आहे. एवढे परिस्थिती आणखी बिकट होते आणि मंदिराच्या पायर्‍या देखील पाण्याखाली जातात. दुचाकी गाड्यांमध्ये पाणी घुसल्यामुळे वाहनधारक देखील त्रस्त झाले आहेत. महापालिकेचे कर्मचारी काही उपाययोजना करतात. मात्र दुसर्‍या दिवशी पुन्हा तीच अवस्था-गटार फाटते, पाणी साचते आणि परिसर डुबतो. या साचलेल्या गटाराच्या पाण्यामुळे विविध आजारांना नागरिक बळी पडत आहेत. त्वचा विकार, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचे संकट निर्माण झाले आहे. काही गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.या भागात  गटार लाईन नव्याने बसवावी, पाण्याच्या निचर्‍याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, आरोग्य विभागाने तातडीने वैद्यकीय शिबिराचे आयोजन करावे , साफसफाई व देखरेख यासाठी खास यंत्रणा नेमावी, सार्वजनिक शौचालयांची तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करावी आदी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Related Articles