पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन   

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून भाविक पुण्यात येतात. त्यामुळे या भाविकांची वाहतुकीची व्यवस्था व्हावी म्हणून पीएमपीकडून १५० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच नियमितच्या बसही प्रवाशांच्या सेवेत असणार आसल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
 
भाविकांच्या सोयीसाठी म्हणून १६ ते २० या कालावधीत स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्थानक, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरी रस्ता येथून आळंदीसाठी १४९ जादा बस सोडण्यात येणार आहे. १९ जून रोजी रात्री १२ पर्यंत आळंदीसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुणे स्थानक, मनपा, निगडी, या ठिकाणावरून देहूसाठी जाद्या गाड्या धावणार आहेत. तसेच देहू ते आळंदी अशा २३ बसचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
२० जून रोजी आळंदीतून पालखी प्रस्थान होत आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजल्या पासून स्वारगेट, पुणे स्थानक, हडपसर, मनपा या ठिकाणावरून आळंदीला जाण्यासाठी १६ जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणार्‍या बस सकाळी ५:३० पासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ११३ बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार देण्यात येईल. तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या दिवशी म्हणजे २२ जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२ ते १ या वेळेत थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्थानक, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदीसाठी ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रस्त्याने मार्गस्थ होईल. अशा वेळी उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल. हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. या मार्गावरील प्रवासी व भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी या मार्गांची बस वाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार आहे. या बसचे संचलन स्वारगेट, पुणे स्थानक, हडपसर असे राहणार आहे. अशा ६० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. असेही पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Related Articles