मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला पुण्यात प्रतिसाद   

माल वाहतूकदार आंदोलनावर ठाम 

पुणे : पुण्यासह राज्यभरात विविध मागण्यांसाठी माल वाहतूकदार संघटनांनी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला बुधवारी शहर आणि परिसरात समाधानकारक प्रतिसाद मिळाला. शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे नुकसान नको म्हणून पहिल्या दिवशी शेतीमालाची वाहतूक करणार्‍या वाहनांना आंदोलनातून सूट देण्यात आली होती. मात्र आज (गुरुवारी) ही वाहने आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी दिली. 
 
वाहतूक पोलिसांकडून जबरदस्तीने होणारी दंड वसुली तात्काळ बंद करावी, या आधी आकारण्यात आलेला दंड माफ करावा, क्लिनरची सक्ती रद्द करण्यात यावी, व्यावसायिक वाहनांना प्रवेश बंदी बाबत व वेळेच्या बाबतीत सूट द्यावी. ई-चलनाच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. आदी मागण्यांसाठी माल वाहतूकदार संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी टेम्पो, ट्रक चालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र ज्या गाड्यात आधीच माल भरण्यात आला आहे, त्या गाड्यातील माल काल खाली करण्यात आला. नव्याने गाड्यात माल भरणे थांबविण्यात आले आहे, असेही डॉ. शिंदे यांनी नमूद केले. 
 
अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले तसेच औषधांची वाहतूक करणारी वाहने आज (गुरुवारी) पासून आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलन असेच सुरू राहिल्यास येत्या दोन दिवसांत अन्नधान्यासह भाजीपाल्यांचा तुटवडा जाणवणार असल्याची शक्यता मार्केटयार्डातील व्यापार्‍यांनी व्यक्त केली. तसेच टेम्पो चालक आंदोलनात सहभागी झाले असल्यामुळे टिंबर मार्केटमध्ये शांतता पाहण्यास मिळाली. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे डॉ. बाबा शिंदे यांनी सांगितले. 
 
चार दिवसांनी परिणाम जाणवेल
 
माल वाहतूकदारांचे आंदोलन सुरू झाले आहे. काल बाजारात ज्या गाड्या आधीच माल भरला होता, त्या गाड्या माल घेऊन आल्या. नव्याने माल भरणे बंद झाले आहे. बाजारातूनही माल भरून गाड्या गेल्या नाहीत. चालू तारीख आहे, त्यामुळे ग्राहक अधिक आहेत. त्यामुळे चार दिवसांनंतर मालाचा तुटवडा जाणवेल.  आणि आंदोलनाचाही परिणामही जाणवेल. 
- रायकुमार नहार, अध्यक्ष, दि पुना मर्चंटस् चेंबर.
 
पहिल्या दिवशी शेतीमाल वाहनांना सूट
 
मार्केटयार्डातील विविध भागात शेतीमाल घेऊन येणार्‍या गाड्यांना काल आंदोलनातून सवलत देण्यात आली होती. मात्र आज (गुरुवारी) शेतकर्‍यांचा शेतीमाल घेऊन येणारी वाहने आंदोलनात सहभागी होणार आहेत. ट्रक, टेम्पो चालकांनी काल काम बंद ठेवले होते. मुंबई आणि परिसरात आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यभरात माल वाहतूकदार मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले आहेत. दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे. 
 
-डॉ. बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघ.

Related Articles