पाकिस्तानच्या संसद अध्यक्षांच्या पगारात ५०० टक्के वाढ   

सामान्य नागरिकांना खर्च कमी करण्याचा सल्ला!

इस्लामाबाद : आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि सहयोगी देशांकडे पैशासाठी हात पुढे करत आहे. असे असतानाच शाहबाज शरीफ सरकारने राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष आणि संसद अध्यक्षांच्या पगारात ५०० टक्के वाढ मंजूर केली आहे.
 
पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अयाज सादिक आणि संसदेचे अध्यक्ष युसूफ रझा गिलानी यांना आता १३ लाख पाकिस्तानी रुपये मासिक वेतन मिळेल. पूर्वी दोघांनाही दरमहा दोन लाख पाच हजार पाकिस्तानी रुपये मिळत होते. या दोघांच्या पगारात ५०० टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ पासून ही वाढ लागू असेल. मागील महिन्यांचा फरक त्यांना देण्यात येईल. 
   
कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि सल्लागारांच्या पगारात १८८ टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. सरकारच्या या पावलावर सामान्य नागरिकांनी जोरदार टीका केली आहे. सर्वसामान्य जनता उच्च कर दर, महागाई, इंधन आणि विजेच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त होत आहे. नागरिकांच्या टीकेनंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सामान्य नागरिकांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिला आहे. 

Related Articles