पिंपरी-चिंचवडला पावसाने झोडपले   

हिंजवडीत रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप

पिंपरी : पिंपरी-चिंचवडला शनिवारी सकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे तासाभरातच शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले होते. तर दुसरीकडे, शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. महापालिकेने गटार व नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित न केल्याने अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. ऐन कामांवर जाण्याच्या वेळेतच पावसाने जोरदार तडाखा दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची दैना उडाली.
 
काल सकाळी दहाच्या सुमारास पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. पावसामुळे वाहने बंद पडल्यामुळे काही ठिकाणी प्रचंड कोंडी झाली होती. हिंजवडी आयटी पार्कमधील विविध कंपन्यांमध्ये कामाला जाणार्‍या अभियंत्यांना पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर व वाकड येथील इंदिरा महाविद्यालयासमोर रस्त्यावर तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर चिंचवड येथील ग्रेडसेपरेटर खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. भोसरी जवळील टेल्को लांडेवाडी आणि शांतीनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्ता, भोसरी एमआयडीसी भागातील बहुतांश ठिकाणी नागरिकांना नदीतून जात असल्याचा अनुभव आला. 
 
निगडी प्राधिकरणात अनेक ठिकाणी कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. या  खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सध्या अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, त्याठिकाणी फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना पाहायला मिळत आहेत. शहरात अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तासभरातील पावसाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार दाखवून दिला, अशी बोलकी प्रतिक्रिया ठिकठिकाणी ऐकायला मिळत होती.

Related Articles