पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य   

पहलगाम घटनेवर FATF ची भूमिका ; लवकरच अहवाल देणार

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ला आर्थिक पाठबळाशिवाय शक्य नाही. सरकार पुरस्कृत दहशतवादाबरोबरच दहशतवाद्यांना अर्थसाह्य करणारी प्रकरणे जाहीर करणारा अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाईल, असे वित्तीय कृती दलाने (एफएटीएफ) म्हटले आहे.
 
एफएटीएफ ही आंतरराष्ट्रीय संघटना असून, ती जगभरात होणारे आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना होणारा पतपुरवठा यावर लक्ष ठेवते. हा निधी आणि मनी लाँडरिंग रोखण्यासाठी ‘एफएटीएफ’कडून कठोर कारवाई केली जाते. ‘एफएटीएफ’ने पहलगाममधील हल्ल्याचा निषेध केला आहे. ही घटना दुर्मीळ मानली जाते. दहशतवाद्यांना होणारा पतपुरवठा रोखण्यासाठी याची संबंधित देशांकडून छाननी वाढविली जाईल, असे सांगून ‘एफएटीएफ’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादी हत्याकांडे घडवून जगभरात भीती निर्माण करीत आहेत. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून, या हल्ल्याचा निषेध करीत आहोत. हा हल्ला आणि अन्यत्र झालेले दहशतवादी हल्ले पैशाच्या पाठबळाशिवाय शक्य नाहीत. दहशतवाद्यांना होणाऱ्या पतपुरवठ्यावर लवकरच विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे.
 
‘एफएटीएफ’ने दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणे दुर्मीळ मानले जाते. गेल्या १० वर्षांत ‘एफएटीएफ’ने केवळ तीन वेळा असा निषेध केला आहे. २०१५ व २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ‘एफएटीएफ’ने निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध केले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सातत्याने पाकिस्तानचा दहशतवाद्यांना असलेला पाठिंबा आणि त्यांना शस्त्रखरेदीसाठी बऱ्याच ठिकाणांहून पैसा पुरविण्याचे मार्ग उपलब्ध करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुळेच पाकिस्तानला ‘एफएटीएफ’ने करड्या रंगाच्या यादीत टाकण्याची मागणीही भारताने केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानला याआधी २००८ व २०१२ मध्ये करड्या रंगाच्या यादीत टाकण्यात आले होते.
 
भारताने पाकिस्तानातील दहशतवादी गटांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या दफनविधीस पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी उपस्थित असल्याचा मुद्दाही भारताने सातत्याने ‘एफएटीएफ’कडे उपस्थित केल्याचे काही माध्यमांनी आपल्या वृत्तात सांगितले. ‘एफएटीएफ’चा अहवाल महिना भरात येणार असून, त्यात प्रथमच ‘एफएटीएफ’ने देशपुरस्कृत दहशतवाद हा विचार मान्य केला आहे, असे सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

भारत देणार राजनैतिक कागदपत्रे

‘एफएटीएफ’च्या एशिया पॅसॅफिक गटाची बैठक २५ ऑगस्ट रोजी होत असून, ‘एफएटीएफ’ची वार्षिक बैठक २० ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यात ‘एफएटीएफ’च्या आर्थिक गैरव्यवहार व दहशतवाद्यांना पतपुरवठ्याच्या नियमांचे पाकिस्तानने कसे उल्लंघन केले आहे, याची विस्तृत माहिती देणारी राजनैतिक कागदपत्रे भारत तयार करीत असून, ती ‘एफएटीएफ’ला देण्यात येणार आहेत.

Related Articles