पालक ७० रूपये गड्डी; आवक घटल्याने उच्चांकी भाव   

पुणे : सातत्याने कोसळत असलेल्या पावसाचा मोठा फटका विविध प्रकारच्या पालेभाज्यांना बसला आहे. या पावसामुळे भाज्या मोठ्या प्रमाणात खराब झाल्या आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात पालकच्या एका गड्डीची शुक्रवारी ५० ते ७० रूपयाने विक्री करण्यात आली. घाऊक बाजारातही पालकला उच्चांकी दर मिळाला आहे, अशी माहिती व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
 
पालकचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. वाढलेल्या दरामुळे स्वयंपाक घरासह, खानावळी, हॉटेलमधून पालक गायब झाली आहे. मार्केटयार्डातील भाजीपाला विभागाते जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून पालकची सर्वाधिक आवक होते. बाजारात मागील महिन्यात ३० ते ३५ हजार जुडींची आवक होत होती. त्यावेळी, जुडीला बाजारात १० ते १५ रुपये दर मिळत होता. मात्र, यंदा मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका पालक भाजीला बसला. शेतातच पालक खराब झाली आहे. उत्पादीत झालेल्या मालामध्ये दर्जाहिन मालाचे प्रमाण लक्षणीय आहे. आवकही घटली आहे. सध्या मार्केट यार्डातील आवक अवघ्या पंधरा हजार जुडींवर आली आहे. घाऊक बाजारात एका जुडीला ३५ ते ५० रुपये दर मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात एका जुडीची विक्री ५० ते ७० रुपयांना विक्री होत आहे. बाजारात दर्जेदार पालक नसल्याने दर्जाहिन मालालाही चांगले दर मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 
 
ज्या शेतातील पालकची काढणी शिल्लक आहे. तेथे जाग्यावरच पालक खराब होत आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्या भागातील काढणी पावसामुळे लांबत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी येणार्‍या पालकमध्ये चांगल्या प्रतीचा माल कमीच आहे. बाजारात रोज जी आवक होत आहे. ती मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले. 
 
दर अधिकच राहणार 
 
मार्केटयार्डात आत्तापर्यंत पालकच्या जुडीला जास्तीत जास्त ३५ रुपये भाव मिळाला होता. मात्र, आता हा भाव ५० रुपयांवर गेला आहे. इतिहासातील हा उच्चांकी भाव आहे. पुढील काही दिवस पालकचे दर अधिक असणार असल्याचा   अंदाज आहे. 
- राजेंद्र सुर्यवंशी, पालेभाज्यांचे व्यापारी, मार्केट यार्ड.

Related Articles