भोपाळ : मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाबाहेर शुक्रवारी वाघाने एका महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. गुल्लीबाई यादव (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. गुल्लीबाई यांचे घर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रापासून जवळच असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असतो. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास गुल्लीबाई घराबाहेर आल्या असता, त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मानपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला असून, त्यांच्या कुटुंबाला तात्काळ १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम शासन नियमाप्रमाणे देण्यात येईल, असे मानपूर वनपरिक्षक मुकेश अहिरवार यांनी सांगितले.
Fans
Followers