नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार   

नवी दिल्ली : वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा  (नीट-पीजी) आता ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यास परवानगी दिली आहे. आधी, ही परीक्षा १५ जून रोजी होणार होती. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनईबीने) परीक्षेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. हा अर्ज न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठसमोर सुनावणीस होता. नीट-पीजी परीक्षा दोन सत्रात घेण्यात यावी, या मागणीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. मागील आठवड्यात न्यायालयाने हा अर्ज फेटाळताना नीट-पीजी परीक्षा एकाच सत्रात घ्या. त्यामुळे पारदर्शकता राहील आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, असेही न्यायालयाने म्हटले होते. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिकांच्या काठीण्य स्तरात भिन्नता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे असमानता आणि मनमानीची शक्यता वाढते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका अचूकपणे एकसमान कठीणतेच्या असतील, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांसाठी समान निकष आणि संधी सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Related Articles