हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवनेरी बससेवा   

पिंपरी : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने हिंजवडी आयटी पार्क फेज-३ ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवनेरी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंजवडी आणि परिसरात राहणार्‍या नागरिकांसह आयटी कर्मचार्‍यांना या मार्गावरील प्रवास सुलभ होणार आहे. हिंजवडी आणि परिसरात अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. यातील बरेच कामगार आणि आयटीयन्स सुट्टीदिवशी गावी जातात. पण, येथून छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे जाण्यासाठी थेट बस सेवा नसल्यामुळे प्रवाशांना स्वारगेट किंवा शिवाजीनगर येथे यावे लागते. त्यातही गर्दीच्या हंगामात गैरसोय होते.
 
दरम्यान, ‘‘हिंजवडी आयटी पार्क ते छत्रपती संभाजीनगर बस सेवा सुरू करावी,’’ अशी मागणी हिंजवडी इंडस्ट्री असोशिएशनकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. या मागणीला एसटी महामंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बससाठी आरक्षण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली आहे.
 
असे आहे वेळापत्रक
 
दर शुक्रवारी : हिंजवडी आयटी पार्क फेज-३ (राजीव गांधी इन्फोटेक टीसीएस) ते छत्रपती संभाजीनगर. वेळ सायं. ६.०० वाजता.
दर सोमवारी : छत्रपती संभाजीनगर ते हिंजवडी आयटी पार्क फेज-३ : वेळ : पहाटे ४.३० वाजता.

Related Articles