मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी   

पुणे : सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोर चहाच्या हॉटेलसमोर बारा जणांना धडक देणार्‍या मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. वाहन चालकाने मद्यपान केले असून त्याला मोटार चालवता येत नसल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.जयराम शिवाजी मुळे (वय-२७, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, जि. धाराशिव) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या मोटार चालकाचे नाव आहे. अपघातावेळी मोटारीतील सहप्रवासी राहुल गोसावी (वय-२७) आणि मोटार मालक दिगंबर शिंदे (वय-२७) यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी १ जूनला मुळेसह गोसावी आणि शिंदेला ताब्यात घेतले होते. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याबाबत मुळेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल समोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणार्‍या गल्लीत चहाचे हॉटेल आहे. ३१ मेला सायंकाळी भरधाव मोटारीने चहा प्यायला थांबलेल्या बारा जणांना धडक दिली. या अपघातात तीन जणांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. जखमीमध्ये काहीजण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. त्यातील काहींची परिक्षा होती. 
 
या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुळेला न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश फडतडे करत आहेत. 

Related Articles