मैत्रिणीकडून होणार्‍या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या   

पुणे : आर्थिक व्यवहारातून मैत्रिणीकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या तरूणाने नवले पूल परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कार्तिक बाबू शेट्टीयार (वय ३४, संतोषनगर, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, कार्तिकचा भाऊ तंगजार बाबू शेट्टीयार (वय ३८) याने दिलेल्या तक्रारीवरून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात एका तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
कार्तिक हा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. तर, आरोपी तरुणी ही नृत्याचे कार्यक्रम करते. दोघांमध्ये मैत्री झाली होती. दरम्यान, ३० एप्रिल रोजी दोघे नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये गेले होते. तेथे, दोघांमध्ये वाद झाल्यावर कार्तिकने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिकचे नातेवाईक आणि मित्रांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
 
कार्तिकच्या सांगण्यावरून त्याच्या मित्रांनी आरोपी तरुणीला पैसे दिले हाते. तरुणीबाबतची माहिती तक्रारदार तंगराज यांना मिळाली होती. त्यांनी कार्तिककडे विचारणा केली असता, संबंधित तरुणी ही मैत्रीण असल्याचे त्याने तंगराज यांना सांगितले होते. तसेच, पैसे परत न करता आरोपी तरुणी ही त्रास देत असून, तिच्या त्रासामुळे आत्महत्या करावे लागेल, असे कार्तिकने तंगराज यांना सांगितले होते. कार्तिक याच्या आत्महत्येस तरुणी जबाबदार असल्याचे तंगराज यांनी तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी तपास करून अखेर आरोपी तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles