भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता   

सायप्रस दौर्‍यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा विश्वास

निकोसिया : भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता लवकरच होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस येथेव्यक्त केला. सायप्रसमधील कंपन्यांनी भारतात उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौर्‍यावर असून त्यांनी सायप्रसला भेट दिली. मोदी यांच्या रुपाने २३ वर्षानंतर भारताचे पंतप्रधान सायप्रस दौर्‍यावर आले आहेत. त्यामुळे या दौर्‍याला महत्त्व आले आहे.  सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडाउलाइड यांनी मोदी यांचे स्वागत केले. दरम्यान, सायप्रसच्या दक्षिण किनारपट्टीवरील लिमासोल शहरात रविवारी आयोजित उद्योगपतींच्या गोलमेज परिषदेत मोदी सहभागी झाले होते. 
 
गेल्या ११ वर्षांत भारताने आर्थिक परिवर्तन घडविले आहे. त्यासाठी नवीन योजना आखल्या आहेत. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे आखली. त्यामुळे भारत जगातील मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत आहे, असे मोदी यांनी सांगितले, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निवदेनाद्वारे दिली.
 
पाचवी आर्थिक महासत्ता होण्यासाठी कल्पकता, डिजिटल क्रांती, स्टार्टअपना प्रोत्साहन आणि भावी पायाभूत विकासाला चालना दिली.  त्यामुळे भारताचा आत्मविश्वास अधिक वाढला असून येत्या काही वर्षांततो जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. त्यासाठी कर रचनेत आणि वस्तू आणि सेवा करामध्ये फेरबदल, कॉर्पोरेट करात बदल, गुन्हेगारीमुक्त कायदे आणि उद्योगांना बळ देण्याबरोबर ते वाढण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले.

सायप्रसच्या कंपन्यांना गुंतवणुकीचे आवाहन 

नागरी विमान सेवा, बंदरे, जहाजबांधणी, डिजिटल पेमेंट आणि हरित विकास या सारख्या क्षेत्रांत सायप्रसच्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. या संधीचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. 

Related Articles