महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये   

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार्‍या या स्पर्धेला ३० सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात होईल. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना हा २ नोव्हेंबरला नियोजित आहे. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील सलामीच्या लढतीने या स्पर्धेला सुरुवात होणार असून याच मैदानात अंतिम सामनाही खेळण्यात येणार आहे. पण जर पाकिस्तान महिला संघ फायनलसाठी पात्र ठरला तर ही लढत श्रीलंकेतील कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर स्थलांतिरित करण्याची वेळ येऊ शकते. 
 
महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील १३ हंगामातील सामन्यासाठी पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यात बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमशिवाय गुवाहाटी, इंदुर, विशाखापट्टणम आणि श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमचा समावेश आहे. जवळपास महिनाभर चालणार्‍या या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी असतील. नॉक आउट राउंडमधील २९ ऑक्टोबरला पहिला सेमी फायनल सामना गुवाहटी किंवा कोलंबोच्या मैदातील खेळवण्यात येणार असून दुसरा सेमीफायनल सामना हा ३० ऑक्टोबरला बंगळुरुच्या मैदानात रंगणार आहे.

१३व्या हंगामातील ८ संघ

महिला विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी यजमान भारत आणि श्रीलंकेसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान महिला संघांचा सहभाग असेल. ऑस्ट्रेलियन महिला संघ गत चॅम्पियन असून ते पुन्हा एकदा आपला दबदबा दाखवून देण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये रंगलेल्या स्पर्धेत त्याने सातव्यांदा स्पर्धा जिंकली होती. दुसर्‍या बाजूला घरच्या मैदानातील फायदा उठवत भारतीय संघ पहिल्यांदा ही  स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

पाकिस्तान महिला संघ कुठे खेळणार सामने?

भारत-पाक यांच्यातील तणावामुळे २०२४-२०२७ या कालावधीत दोन्ही देशांनी आयोजित केलेल्या आयसीसी स्पर्धांमधील भारत-पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येतील, असा करार बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात झाला आहे. या करारानुसार पाकिस्तान महिला संघ आपले सामने कोलंबोच्या मैदानात खेळेल. सेमीसह ते फायनलसाठी पात्र ठरले तर भारतातील नियोजित ठिकाणांमध्ये बदल करावा लागू शकतो. यासंदर्भात अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 
 

Related Articles