पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार   

मुल्लानपूर/मोहाली : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणार्‍या लखनौ सुपर जाएंट्सला पराभूत करत १९ गुणांसह  संघाने गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर पोहचला. पंजाब किंग्जचा संघाच्या खात्यातही १९ गुण आहेत. पण उत्तम धावगतीमुळे पंजाब किंग्जचा संघ अव्वल ठरला. गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांसह तिसर्‍या तर मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या स्थानावर राहिला. आता 
प्लेऑफ्समधील चार संघापैकी अव्वल दोन संघ पहिल्या क्वॉलिफायरमध्ये थेट फायनल गाठण्यासाठी भिडतील. 
 
प्लेऑफ्समध्ये अव्वल दोन स्थानावर असलेल्या पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आज पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात येईल. आज मुल्लानपूर येथे रंगणार्‍या सामन्यात दोन्ही संघ अंतिम फेरी गाठण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्यांना दुसर्‍या क्वॉलिफायर लढतीतून फायनल गाठण्याची एक संधी असेल. एलिमिनेटरमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससमोर शुबमन गिलच्या गुजरात टायटन्सचे चॅलेंज असेल. हार्दिक पांड्या याने पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सला चॅम्पियन केले होते. गत हंगामात हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सची साथ सोडून पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी केली.
 
गत हंगामात लाजिरवाण्या कामगिरीनंतर यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेऑफ्समध्ये स्थान मिळवले. हार्दिक पांड्या एक्स टीम विरुद्ध बाजी मारत मुंबई इंडियन्सला फायनलच्या दिशेनं घेऊन जाणार का? ते पाहण्याजोगे असेल. ३० मे रोजी दोन्ही गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटरचा सामना खेळवण्यात येईल. दोन्ही संघासाठी पहिला अडथळा हा एलिमिनेटरची लढत आणि दुसरा अडथळा म्हणजे क्वालिफायर २ ची लढाई असेल. या दोन लढती जिंकल्या तरच तिसर्‍या चौथ्या स्थानावरील संघ फायनल खेळताना दिसेल.
 
क्वालिफायर १ मधील विजेता थेट फायनलमध्ये एन्ट्री मारेल. या संघातील पराभूत संघ एलिमिनेटरमधील विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर २ मध्ये खेळताना दिसेल. ही लढत १ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या सामन्यातील विजेता ३ जूनला क्वालिफायर १ मधील विजेत्या विरुद्ध फायनल खेळेल. हा सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
 
प्लेऑफ्समधील लढतींचे वेळापत्रक
 
क्वालिफायर १ : २९ मे २०२५, पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - मुल्लानपूर
एलिमिनेटर : ३० मे २०२५, मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - मुल्लानपूर
क्वालिफायर २ : १ जून २०२५,  क्वालिफायर १ पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता - अहमदाबाद
फायनल : ३ जून २०२५,  क्वालिफायर १ विजेता विरुद्ध क्वालिफायर २ विजेता - अहमदाबाद

Related Articles