कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल   

मुंबई : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटीतील निवृत्तीची चर्चा रंगत असताना भारताचा रवींद्र जडेजा याने या क्रिकेट प्रकारात मोठा पराक्रम करून दाखवत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. सध्याच्या घडीला रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये व्यग्र आहे. तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळताना दिसतो. मग कसोटीत त्याने कसा विक्रम नोंदवला असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आयपीएल खेळत असताना रवींद्र जडेजा कसोटीत मोठा डाव कसा साधला. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजाने अव्वलस्थान कायम राखले आहे. नव्या क्रमवारीत खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. यासह सर्वाधिक काळ अव्वल राहण्याचा खास विक्रम त्याच्या नावे झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा ४०० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. 
 
रवींद्र जडेजा ९ मार्च २०२२ रोजी वेस्टइंडीजच्या जेसन होल्डरला मागे टाकत कसोटी क्रमवारीतील अव्वल अष्टपैलू खेळाडू ठरला होता. मागील ३८ महिन्यांपासून जडेजाने आपली बादशाहत कायम ठेवण्यात यश मिळवली. २०१७ मध्ये पहिल्यांदा तो कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला होता. पण त्यावेळी फक्त आठवडाभरच तो नंबर वन राहिला. पण आता तब्बल ११५२ दिवस तो आपले अव्वल स्थान टिकवून आहे.
 
कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा पाठोपाठ बांगलादेशाचा मेहदी हसन मिराज ३२७ रेटिंग गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने मार्को यान्सेन (२९४ रेटिंग गुण) याला मागे टाकले आहे.ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स या यादीत चौथ्या क्रमांकावर असून शाकिब अल हसन टॉप ५ मध्ये आहे. जडेजा वगळता अन्य कोणताही भारतीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल १० मध्ये दिसत नाही. अक्षर पटेल १२ व्या स्थानावर दिसतो. 

Related Articles