अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी   

तालिबान सरकारचा निर्णय 

काबुल : अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने बुद्धिबळ खेळावर बंदी घातली आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या क्रीडा मंत्रालयाचे प्रवक्ते अटल मशवानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. मशवानी म्हणाले, शरिया कायदानुसार बुद्धिबळ हा जुगार समजला जातो आणि तालिबान शरिया कायद्याचे काटेकोरपणे पालन करतो. मागील वर्षी जाहीर झालेल्या सद्गुण प्रचार आणि अनैतिक व्यवहार निवारण कायद्यानुसार जुगाराला बंदी घालण्यात आलेली आहे. बुद्धिबळावर बंदी घालण्याचे सर्वात मोठे कारण धार्मिक चिंता आहेत. जोपर्यंत धार्मिक समस्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळावरील बंदी कायम राहील. 
 
अफगाणिस्तानमध्ये सर्व प्रकारच्या खेळाच्या स्पर्धांचे व्यवस्थापन करणार्‍या तालिबान सरकारच्या क्रीडा संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे अफगाणिस्तानी नागरिक गोंधळात पडले आहेत. तेथे अनेक कॅफेंमध्ये बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात. बुद्धिबळ स्पर्धांचा कोणत्याही जुगाराशी संबंध नाही. मुस्लीम राष्ट्रांमध्ये तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहेत. अलीकडच्या काळात तरुणांना खेळण्यासाठी फार खेळ राहिले नाहीत. त्यामुळे जास्त लोक बुद्धिबळ खेळायला येतात, असे कॅफेचालक म्हणत आहेत. त्यामुळे नागरिकही आता गोंधळात पडले आहेत.

Related Articles