E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
हरता हरता जिंकले!
Wrutuja pandharpure
11 May 2025
चर्चेतील चेहरे , राहुल देशपांडे
सार्वत्रिक निवडणुकीत ज्या पक्षाचा पराभव निश्चित मानला जात होता त्याच मजूर पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देण्यातच नव्हे तर मागच्या खेपेपेक्षा जास्त जागा मिळवून निर्विवाद यश मिळवून देण्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यशस्वी ठरले आहेत. तथापि त्यांचा हा विजय म्हणजे त्यांच्या कारभारावर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब किती आणि प्रतिस्पर्धी लिबरल पक्षाच्या नाकर्तेपणाचा आणि परिणामतः अल्बनीज यांच्या पक्षाला विश्वासार्ह पर्याय नसण्याचा भाग किती हे मात्र तपासून पाहणे गरजेचे.
याचे कारण दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या सर्वेक्षणात अल्बनीजी यांची लोकप्रियता कमालीची घटल्याचे सिद्ध झाले होते. लिबरल पक्ष सत्ता हस्तगत करणार हेही गृहीत धरले गेले होते. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेले व्यापार युद्ध; त्यापेक्षाही ट्रम्प यांच्याच भाषेत बोलणारे लिबरल पक्षाचे नेते पीटर डटन यांचा ध्रुवीकरण करणारा प्रचार याचा परिणाम मतदारांनी सत्ताबदलाचा विचार मागे ठेवून सत्तासलगतेला आणि राजकीय स्थैर्याला प्राधान्य देण्यात झाला. आपल्या पक्षाला सलग दुसर्यांदा सत्तेत पोचविणारे अल्बनीज ऑस्ट्रेलियातील बर्याच कालावधीनंतरचे पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी लिबरल पक्षाचे जॉन हॉवर्ड हे २००७ पर्यंत सलग अकरा वर्षे पंतप्रधान होते.
अल्बनीज यांची प्रतिमा मजुरांचे तारणहार अशी झाली आहे. याचे एक कारण म्हणजे गरीब कुटुंबात गेलेले त्यांचे स्वतःचे बालपण. १९६३ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांची आई आयरिश वंशाची होती. तिने एकटीने आपल्या या मुलाला वाढवले. आपल्या वाट्याला आलेले कष्ट आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत या हेतूने तिने आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी नेहेमी प्रेरित केले. आपल्या वडिलांचे निधन आपल्या जन्मापूर्वीच झाले या समजात अल्बनीज अगदी तरुण वयापर्यंत होते. मात्र आपल्या मातेच्या निधनानंतर त्यांनी आपले वडील कार्लो अल्बनीज यांच्या विषयी माहिती काढायचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. कार्लोस हयात होते आणि इटलीत स्थायिक झाले होते. कार्लोस यांचा विवाह झाला होता आणि विवाहबाह्य संबंधांतून अँथनी यांच्या आईने आपल्या पुत्राला जन्म दिला होता. त्यानंतर कार्लोस परागंदा झाले होते. तरीही अल्बनीज यांनी इटलीत जाऊन आपल्या वडिलांची भेट घेतली होती. त्यानंतर काहीच वर्षांत कार्लोस यांचा मृत्यू झाला.
अर्थात या दरम्यान अल्बनीजी यांची शैक्षणिक वाटचाल सुरु होती. १९८४ मध्ये त्यांचे महाविद्यालातीन शिक्षण पूर्ण झाले. पुढे सिडनी विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर दोन वर्षे ते एका बँकेत नोकरी करीत होते. पण त्यांचा ओढा राजकारणाकडे होता; तोही अगदी कळत्या वयापासून. आणि पुढे त्यांनी तेच क्षेत्र निवडले. विद्यार्थी चळवळीतून त्यांचा राजकारणाशी संबंध आला. अर्थात कष्टकरी कुटुंबात झालेला जन्म; सरकारने बांधून दिलेल्या घरात असलेले वास्तव्य यांमुळे अल्बनीज यांचा स्वाभाविक कल हा मजूर पक्षाकडेच होता.
आपल्या जीवनाला तीन बाबींनी आकार दिला असे ते म्हणतात: कॅथॉलिक चर्च; सिडनी येथील फुटबॉल क्लब आणि मजूर पक्ष. १९९६ मध्ये ते प्रथम ऑस्ट्रेलियन संसदेवर मजूर पक्षातर्फे निवडून गेले. तेंव्हापासून आजतागायत अल्बनीज यांनी तो मतदारसंघ राखला आहे. जवळपास तीस वर्षे ते त्याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आले आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी मजूर पक्षात प्रवेश केला. ते जेंव्हा पहिल्यांदा खासदार झाले तेंव्हा ते ३३ वर्षांचे होते. २०२२ मध्ये ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले; तेंव्हा त्यांनी वयाची साठी गाठली होती.
या प्रदीर्घ राजकीय वाटचालीची सुरुवात झाली ती मजूर पक्षाचे नेते टॉम युरेन यांचे संशोधन अधिकारी म्हणून. १९८५ ते १९८७ या काळात अल्बनीज हे न्यू साऊथ वेल्सच्या पक्ष युवा आघाडीचे अध्यक्ष होते. खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी अनेक महत्वाची विधेयके संसदेत मांडली. त्यांतीलच एक होते ते समलैंगिक जोडप्यांना अन्य जोडप्यांप्रमाणेच निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची तरतूद करण्याचे. ते विधेयक संमत झाले नाही. त्यांनतर अल्बनीज यांनी पुन्हा तीनदा ते विधेयक मांडले; तरीही ते मंजूर होऊ शकले नाही. अखेरीस केविन रड यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाचे सरकार सत्तेत आले तेंव्हा ते विधेयक २००७ मध्ये संमत झाले. समलैगिकांचे अधिकार, हवामान बदल, सर्वांना मोफत आरोग्य व्यवस्था हे अल्बनीज यांचे कायमच जिव्हाळ्याचे विषय राहिले आहेत.
२००६ मध्ये पक्षाने त्यांना पर्यावरण खात्याचे शॅडो मंत्री नेमले. त्यावेळी त्यांनी हवामान बदलाच्या परिणामांवर तोडगा काढण्यासाठी धोरण-आराखडा तयार केला. पुढे मजूर पक्ष सत्तेत आला तेंव्हा त्या पक्षाने त्यालाच धोरण तयार करण्यासाठीचा आधार मानले. २००७ मध्ये रड यांच्या मंत्रिमंडळात अल्बनीज यांना पायाभूत सुविधा खात्याचे मंत्री नियुक्त करण्यात आले. याच काळात अल्बनीज यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी धोरणे आखली. रस्ते विकासासाठीची अंदाजपत्रकीय तरतूद दुपटीने तर रेल्वे विस्तारीकरणासाठीची दसपटीने वाढविण्यात आली. परिणामतः हजारो जणांना रोजगार मिळाला. २०१३ मध्ये रड यांच्याच मंत्रिमंडळात अल्बनीज उपपंतप्रधान बनले. अर्थात त्या पदावर ते केवळ तीन महिने होते. याचे कारण मजूर पक्षातील सुंदोपसुंदी.
२०१९ च्या निवडणुकीत मजूर पक्षाच्या झालेल्या पराभवानंतर पक्षाचे नेते बिल शॉर्टेन पायउतार झाले आणि ती धुरा अल्बनीज यांनी सांभाळली. २०२२ च्या निवडणुकीसाठी त्यांनी व्यूहरचना आखली ; मेहनत घेतली हेही नाकारता येत नाही. पण आता डटन यांचा नाकर्तेपणा आणि उन्माद जसा अल्बनीज यांच्या पथ्यावर पडला तसाच २०२२ मध्ये त्यावेळचे लिबरल पक्षाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा सुमार कारभार अल्बनीजी यांच्या पथ्यावर पडला. दहा वर्षांच्या अवधीनंतर मजूर पक्ष सत्तेत पोचला.
अल्बनीज यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. प्रमुख होते ते करोनाच्या साथीनंतर ढेपाळलेली अर्थव्यवस्था सावरण्याचे. देशात महागाई वाढलेली होती; घरांची टंचाई निर्माण झाली होती; त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन, फ्रान्स यांच्याशी अगोदरच्या राजवटींनी संबंध बिघडवून ठेवले होते. हवामान बदलावर धोरणात्मक निर्णय अगोदरच्या सरकारांनी वेळीच न घेतल्याने ऑस्ट्रेलियन नागरिकांना प्रलयंकारी पुरासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत होते. या सगळ्या संकटांना भिडताना अल्बनीज यांनी आपली कार्यशैली एककल्ली करणे टाळले. आपल्या मंत्र्यांना त्यांनी पुरेशी मोकळीक दिली; एकेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. चीनशी त्यांनी संबंध सुरळीत केले; फ्रान्सला देखील विश्वासात घेतले. महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी करांमध्ये कपात केली; रुग्णांना किफायतशीर औषधे मिळावीत यासाठी प्रयत्न केला.
पुढील पाच वर्षांत सरकारतर्फे बारा लाख घरे बांधण्यात येतील असे वचन दिले. हवामान बदलाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी अक्षय ऊर्जेला धोरणात्मक रूप दिले. तरीही अपेक्षित परिणाम दिसत नव्हता आणि सामान्य जनता नाराज होती. त्यातच अल्बनीज काही वादांत अडकले. आदिवासींना घटनेत स्थान देण्यासाठी त्यांनी सार्वमत घेतले. पण मतदारांनी ते झिडकारले; तेंव्हा जनतेचे प्रबोधन पुरेशा प्रमाणात अल्बनीज यांनी केले नाही असा त्यांच्यावर आरोप झाला. एकीकडे घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना अल्बनीज यांनी मात्र डोंगरमाथ्यावर ४० लाख डॉलर किंमतीचे आलिशान घर खरेदी केले. त्यावरून काहूर उठले. हमासने इस्रायलवर ऑक्टोबर २०२३ मध्ये हल्ला केला तेंव्हा सुरुवातीस इस्रायलच्या बाजूने असणारे अल्बनीज यांनी स्वसंरक्षण म्हणजे काहीही करण्याची मुभा नव्हे असा इस्रायलच्या संदर्भात भूमिकाबदल केला. ऑस्ट्रेलियात ज्यूंवर वाढलेल्या हल्ल्यांसाठी अल्बनीजी प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले.
या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मजूर पक्षाचा पराभव गृहीतच धरण्यात येत होता. पण ट्रम्प यांनी लादलेले प्रत्युत्तर्र शुल्क; त्यातच विरोधी पक्षाचे नेते डटन यांची स्थलांतरितांविषयीची अतिरंजित विधाने; वोकविरोधी भूमिका; मुस्लिमविरोधी गरळ; माध्यमांच्या विरोधातील आकस आणि एकूणच ट्रम्प यांच्या जवळ जाणारी कार्यशैली यांमुळे मतदारांनी आपला कल बदलला. डटन पक्षाला विजयी करून देऊ शकले नाहीतच; पण ते स्वतःही पराभूत झाले. मजूर पक्षाला मात्र घवघवीत यश मिळाले आणि आता अल्बनीज पुन्हा पंतप्रधान होण्याचा मर्ग मोकळा झाला आहे. आपण क्रांतिकारक नव्हे तर सुधारणावादी आहोत असे सांगणारे अल्बनीज यांना आश्वासनांची पूर्तता करून दाखवावी लागेल. २०२२ आणि आताही; त्यांच्या विजयात काही प्रमाणात नशीबाचा वाटा होता व आहे हे नाकारता येणार नाही. परंतु आता मेहनतीची पराकाष्ठा अँथनी अल्बनीज यांना करावी लागेल. नशीब दरवेळी साथ देईलच याची खात्री देता येत नसते.
Related
Articles
पंतप्रधान आवास योजना
08 Jun 2025
नाशिकमधील भीषण अपघातात सहा ठार
06 Jun 2025
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
पतौडी कसोटी स्पर्धेचे ’तेंडुलकर-अँडरसन चषक’ असे नामांतर
07 Jun 2025
पंतप्रधान आवास योजना
08 Jun 2025
नाशिकमधील भीषण अपघातात सहा ठार
06 Jun 2025
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
पतौडी कसोटी स्पर्धेचे ’तेंडुलकर-अँडरसन चषक’ असे नामांतर
07 Jun 2025
पंतप्रधान आवास योजना
08 Jun 2025
नाशिकमधील भीषण अपघातात सहा ठार
06 Jun 2025
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
पतौडी कसोटी स्पर्धेचे ’तेंडुलकर-अँडरसन चषक’ असे नामांतर
07 Jun 2025
पंतप्रधान आवास योजना
08 Jun 2025
नाशिकमधील भीषण अपघातात सहा ठार
06 Jun 2025
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
02 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
पतौडी कसोटी स्पर्धेचे ’तेंडुलकर-अँडरसन चषक’ असे नामांतर
07 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका