श्रीलंकेत हेलिकॉप्टर अपघातात सहा सैनिकांचा मृत्यू   

कोलंबो : श्रीलंकेत एक लष्करी हेलिकॉप्टर जलाशयात कोसळून सशस्त्र दलाचे सहा सैनिक मृत्युमुखी पडले.श्रीलंका हवाई दलाचे बेल २१२ हे हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी लष्कराच्या स्पेशल फोर्सेस ब्रिगेडच्या पासिंग आउट परेडसाठी जात होते. उड्डाणानंतर काही वेळातच या हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर मध्य प्रदेशातील मादुरु ओया येथे एका जलाशयात ते कोसळले. यात सहा सैनिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हवाई दलाचे दोन कर्मचारी आणि विशेष दलाच्या चार सैनिकांचा समावेश आहे. श्रीलंका हवाई दलाचे प्रवक्ते ग्रुप कॅप्टन एरांडा गीगानागे म्हणाले, घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी मदतकार्य राबवत सैनिकांना जलाशयातून बाहेर काढून रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, सविस्तर चौकशी करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

Related Articles