पाकिस्तानी संसदेत भारताविरोधात गरळ   

इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने  पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील नेते आणि मंत्री बिथरले असून त्यांनी आता आवास्तव विधाने करण्याचा सपाटा लावला आहे. संसदेतही अशाच प्रकारची हास्यास्पद विधाने खासदार पलवाशा खान केली. त्यात बाबरीची पहिली वीट पाकिस्तानी रचतील, असीम मुनीर पहिली अजान देणार याचा समावेश आहे. या वेळी खलिस्तानी दहशतवादी पन्नूचे कौतुकही करण्यात आले.
 
पलवाशा खान या बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तानी पीपल्स पक्षाच्या खासदार आहेत. त्यांनी भारतविरोधी गरळ संसदेत ओकली. अयोध्येत बाबरी मशीद बांधली जाईल आणि रावळपिंडी येथील प्रत्येक सैनिक बाबरीच्या पायाची पहिली वीट रचेल. तेथे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर पहिली अजान देतील त्या म्हणाल्या, ७ लाख सैनिकांवर पाकिस्तान अवलंबून नाही. २५ कोटी लोकसंख्या सैन्यासोबत असेल. नागरिकच सैनिक बनतील. भारताने हल्ला केला तर, दिल्लीतील लाल किल्ल्याचे मैदान रक्ताने  माखेल. पाकिस्तान ही गुरु नानकांची जन्मभूमी असल्याने भारतातील शीख धर्मीय सैनिक पाकिस्तानविरुद्ध लढणार नाहीत. खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नूने पाकिस्तानला युद्धात पाठिंबा देण्याचे जाहीर केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.  दरम्यान, पलवाशने आयएसआयचा माजी प्रमुख झहीर इस्लामशी लग्न केले आहे. त्यांना एक मूल देखील आहे. त्यांचे लग्न ३ वर्षे गुप्त राहिले. २०१९ मध्ये, एका पत्रकाराने त्यांच्या गुपचूप केलेल्या लग्नाचे भांडे फोडले होते. त्याची खूपच चर्चा झाली होती.

हल्ल्याची निर्लज्जपणे कबुली

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी संसदेत निर्लज्जपणे कबूल केले आहे की, त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावातून काढून टाकले आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी संबधित दहशतवादी संघटना असून याच संघटनेने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
संसदेत इशाक दार म्हणाले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित निषेधाचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून आला होता आणि त्यात फक्त पहलगामचा उल्लेेख होता, जम्मू आणि काश्मीरचा नाही. त्यावर पाकिस्तानकडून आक्षेप घेण्यात आला. प्रस्तावात टीआरएफला जबाबदार धरण्यात आले होते. हा प्रस्ताव पाकिस्तानला मान्य नव्हता आणि आम्ही बदल न करता प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, असा दावा त्यांनी केला. 
 

Related Articles