मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती   

विवेक फणसळकरांच्या निवृत्तीनंतर नियुक्ती जाहीर

मुंबई : मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसळकर सेवानिवृत्त झाल्यानंतर देवेन भारती यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली. देवेन भारती हे सध्या मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मुंबईचे सर्वात जास्त काळ सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून काम करणारे पोलीस अधिकारी राहिले आहेत.
 
मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण पोलिस दलासह मुंबईकरांचेही लक्ष लागले होते. महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, सेवाज्येष्ठतेमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले कायदेशीर आणि तांत्रिक विभागात कार्यरत असलेले संजय कुमार वर्मा, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ची धुरा सांभाळणारे सदानंद दाते यांची नावेही आयुक्तपदाच्या शर्यतीत होती. मात्र मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी विराजमान असलेल्या देवेन भारती यांचे नाव आयुक्तपदासाठी अग्रेसर मानले जात होते.

कोण आहेत देवेन भारती?

देवेन भारती हे मूळचे बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहेत. झारखंडमध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी 'दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून पदवी मिळवली. ते 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत डीसीपी, झोन ९ आणि डीसीपी गुन्हे शाखेत त्यांनी काम केलेले आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून देवेन भारती ओळखले जातात. फडणवीस मुख्यमंत्रिपदी असताना २०१४ ते २०१९ या काळात देवेन भारती सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर होते. त्यावेळी त्यांचा प्रभाव उल्लेखनीय होता. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावर त्यांना बढती दिली होती.
 

Related Articles