विशेष अधिवेशन बोलवा   

खर्गे, राहुल यांची मागणी

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
 
या क्षणी ऐक्य आणि एकता आवश्यक आहे. त्यामुळे, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलाविण्यात यावे, अशी आम्हा विरोधकांची मागणी असल्याचे खर्गे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
 
या संकटाच्या काळात एकजूट दाखवण्यासाठी संसद हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकते. संसदेमध्ये सरकारने आपली सुरक्षा नीती, उपाययोजना यावर चर्चा करावी आणि संपूर्ण देश एकत्र उभा आहे, हे दाखवावे, असे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. यात बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्यानंतर देशभर संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, सर्वत्र जनक्षोभ पाहायला मिळाला. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असताना राजकारणापलीकडे जाऊन सर्व पक्ष एकत्र यावेत आणि संसदेच्या माध्यमातून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ठोस निर्णय घ्यावेत, असे काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. 
 
संसदेचे विशेष अधिवेशन पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याला सामूहिक संकल्प आणि इच्छाशक्तीचे शक्तिशाली उत्तर असेल. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हे अधिवेशन बोलवावे, अशी आमची इच्छा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles