राष्ट्रभावनेतून जवानांसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी   

सुमेधा चिथडे यांचे प्रतिपादन 

पुणे : जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन येथे देशाचे रक्षण करणारे जवान प्रत्येक श्वासासाठी संघर्ष करतात. समाजाची साथ, भारतीय सैन्य दलाने दिलेली संधी आणि राष्ट्रसेवेच्या भावनेतून तेथील जवानांसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारता आला. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता आली. प्रत्येक भारतीयांनी दैनंदिन जीवनात राष्ट्रभक्ती जपली व जगली पाहिजे. अशी अपेक्षा ‘सिर्फ’ संस्थेच्या प्रमुख सुमेधा चिथडे यांनी मंगळवारी व्यक्त केली.   
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या १५०व्या ज्ञानसत्रात दिव्यांग सैनिकांसाठी कार्यरत असलेल्या ‘सिर्फ’ संस्थेच्या प्रमुख सुमेधा चिथडे यांना वक्तृत्वोत्तेजक सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, ग्रंथोत्तेजक सभा, पुणे प्रार्थना समाज आणि सेवासदन संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे स्मृती पुरस्कार वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर चिथडे यांनी ’राष्ट्राय स्वाहा इदं न मम’ या विषयावर विचार मांडले. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, कार्यवाह डॉ. गीताली टिळक, प्रार्थना समाजाचे कार्यवाह डॉ. दिलीप जोग, ग्रंथोत्तेजक सभेचे कार्यवाह अविनाश चाफेकर, पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यवाह श्रध्दा परांजपे आदी उपस्थित होते. 
 
सीमेवरचे सैनिक राष्ट्रसुरक्षा आणि राष्ट्रहित जपतात. घरापासून दूर राहून एकीकडे निसर्ग संकटांचा, तर दुसरीकडे सीमेपलीकडील शत्रुचा सामना करतात. ‘मी’ म्हणजे संपूर्ण राष्ट्र या भावनेने ते जगत असतात. भोगवादाकडून त्यागवादाकडे जाण्याचे सामर्थ्य सैन्यात आहे. सियाचीन येथे देशकार्य बजावत असलेल्या जवानांना एक श्वास, एक घास आणि एक घोटासाठी संघर्ष करावा लागतो. तरी त्यांची कोणतीही तक्रार नसते. अपेक्षा नसते. निस्वार्थ राष्ट्रसेवा करत संपूर्ण आयुष्य ते राष्ट्रासाठी समर्पित करतात. अपेक्षा केली की, उपेक्षेचे दु:ख येते. त्यामुळे स्वत:साठी न जगता अनेकांसाठी जगणे हेच खरे जीवन असल्याचेही चिथडे यांनी नमूद केले. 
 
स्वत:ला विसरले तरच समाज कार्य उभे राहते. प्रारंभीच्या काळात कार्य करताना अनेकांनी माझ्या कार्याची चेष्ठा केली. मात्र राष्ट्रकार्यासाठी सर्व काही पचविले. सैन्य कार्यासाठी मागितलेल्या भीक्षेतून समाज मन वाचायला शिकले. त्यातून जीवन उन्नत झाले. त्यातूनच समर्पण आणि अर्पण शिकता आले.
तीन वर्षात २.५ कोटीचा निधी उभारून त्यातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला. सैन्याविषयी आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी, ती कृतज्ञता दैनंदिन जीवनातील कृतीतून व्यक्त व्हावी, अशी अपेक्षा चिथडे यांनी व्यक्त केली. 
 
प्रारंभी डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती महादेव गोंविद रानडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सिर्फ संस्थेचे पदाधिकारी अनुराधा कोटीभास्कर, मंजिरी जोशी, सुमेध पाथुरकर यांचा डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अविनाश चाफेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुषमा जोग यांनी गीत सादर केले. अनुजा पालकर यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. दिलीप जोग यांनी आभार मानले. प्रारंभी प्रताप बिडवे व महादेव तुपे यांचे सणई-चौघडा वादनाने वातावरण प्रफुल्लीत झाले.

Related Articles