प्रतिका रावळ, स्नेह राणामुळे भारताचा विजय   

कोलंबो : स्नेह राणाने आपल्या फिरकीच्या जोरावर सामना भारताच्या बाजूनं वळवला. प्रतिका रावल हिच्या दमदार अन् विक्रमी खेळीनंतर स्नेह राणा हिने आपल्या फिरकीची जादू दाखवत घेतलेल्या पाच बळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला रोखत १५ धावांनी विजय नोंदवला. श्रीलंका-भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी वनडे मालिकेतील भारतीय संघाचा दुसरा सामना आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने  निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २७६ धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासमोर २७७ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ताझमिन ब्रिट्स हिने शतकी खेळी केली. पण तिची ही खेळी स्नेह राणाच्या जादुई फिरकीसमोर व्यर्थ ठरली. पहिल्यांदा फलंदाजी करताना सलामीची बॅटर प्रतिका रावल हिने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. तिने ९१ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७८ धावा केल्या. या खेळीसह तिने वनडेत सर्वात जलद ५०० धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावे केला. स्मृती मानधना हिने या सामन्यात ५४ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. या दोघींशिवाय हरलीन देओल २९ (४७), हरमनप्रीत कौर ४१ (४८)*, जेमिमा रॉड्रिग्ज ४१ (३२), रिचा घोष, २४ (१४), दिप्ती शर्मा ९ (८) आणि काशवी गौतम ५ (६)* यांनी संघासाठी उपयुक्त योगदाना दिले. भारतीय महिला संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड आणि ताझमिन ब्रिट्स या दोघींनी दमदार सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. दोघींनी पहिल्या बळीसाठी १४० धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना सहज जिंकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना दिप्ती शर्मानं दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनच्या रुपात भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली. 
 

Related Articles