पुण्याच्या इतिहासपुरुषाबरोबर रंगला हेरिटेज वॉक   

पुणे : ’टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’, ‘दैनिक केसरी’ आणि ’हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांसाठी हेरिटेज वॉक हा उपक्रम दर महिन्यात आयोजित करण्यात येतो. हा उपक्रम नि:शुल्क असून श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या सहकार्याने चालवण्यात येतो.
 
नुकत्याच झालेल्या उपक्रमात पुण्याच्या इतिहासाचा चालताबोलता ज्ञानकोश अशी ख्याती असलेले पांडुरंग बलकवडे यांनी पुण्याचा इतिहास वारसाप्रेमींच्या डोळ्यासमोर उभा केला. त्यांनी पुण्याचे भौगोलिक स्थान, राजकीय पार्श्वभूमी, अगदी सातवाहन काळापासून ते ब्रिटीश काळापर्यंत पुणे शहर कसे कसे मोठे होत गेले याचा सविस्तर आढावा घेतला. वेगवेगळे शिलालेख आणि ताम्रपट यामधून पुण्याची परिसरातील बोपखेल, भोसरी यांची माहिती कशी आली आहे हे सुद्धा बलकवडे यांनी मूळ लेखांची माहिती सांगत स्पष्ट केले.
 
बडा अरब हा अधिकारी जेव्हा पुण्यामध्ये आला तेव्हा त्याने पुण्यात किल्ले हिस्सार नावाचा कोट बांधला. त्या कोटाच्या भिंतीमध्ये वापरले गेलेले दगड आजही अनेक स्थळी आढळतात. मोटे मंगल कार्यालय, त्याच्या मागच्या बाजूस असणारे जुन्या भिंतीचे अवशेष या सर्वांची माहिती सांगून नंतर बाळोबा मुंजोबा देवस्थानात सगळे वारसाप्रेमी जमले. मुंजा म्हणजे काय आणि पुण्याच्या इतिहासात त्याचे नेमके काय महत्त्व आहे याचीही माहिती त्यांनी सांगितली.
 
बाळोबा मुंजोबा देवस्थानात असलेले वीरगळ वेगवेगळ्या संदर्भातून कसे अतिशय महत्त्वाचे आहेत हेही त्यांनी सविस्तर सांगितले. मंदिराचे विश्वस्त पायगुडे हेही यावेळेस उपस्थित होते. पेशव्यांच्या काळातील मोडी कागदपत्रात आलेली या मंदिराची माहितीसुद्धा बलकवडे यांनी सांगितली. लढाईला जाण्याच्या आधी आणि लढाईवरून परत आल्यानंतर या मुंजाबाच्या मंदिरात दिवा लावून नमस्कार करण्याची पद्धत होती. या मंदिराच्या दिवाबत्तीच्या खर्चासाठी पेशव्यांनी दरमहा एक रुपया असे दान लावून दिले होते. 
 
जुन्या पुण्याची वेस कशी होती, कसबा पेठेत कुठे कुठे काय काय आहे, देशपांडे चर्च संकुलाच्या आवारातील प्राचीन इमारतीचे अवशेषही या वेळी सर्वांनी पहिले. पुण्यातल्या मोठ्या मोठ्या ओढ्यांचे प्रवाह कसे गेले होते, पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरे कुठे होती आणि त्यांचे पुढे काय झाले हे सगळे पांडुरंग बलकवडे यांनी सविस्तर सांगितले.
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळेस इतिहासप्रेमी महेश बुलाखे, हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि. या संस्थेच्या वतीने वंदना बोलाखे, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या सहयोगी प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. मंजिरी भालेराव आदि उपस्थित होते.
 

Related Articles