सज्जनगड रस्त्यावर अपघात; दोन युवक ठार   

सातारा,(प्रतिनिधी) : सातार्‍यातील सज्जनगड घाट रस्त्यावर दुर्दैवी घटना समोर आली आहे. शालेय परीक्षा नुकतीच संपवलेले दोन विद्यार्थी, वडापाव खाण्यासाठी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर गेले होते. मात्र गावी परत येताना झालेल्या अपघातात दोघांनीही आपला जीव गमावला. ही घटना अंबवडे बुद्रुक, तालुका सातारा येथील आहे. 
 
वेदांत शरद शिंदे(वय१५) आणि प्रज्वल नितीन किर्दत(वय १४) हे दोघे बालपणापासूनचे घट्ट मित्र. शालेय परीक्षा संपल्याच्या आनंदात, सज्जनगड गड रस्त्यावर वडापाव खाण्यासाठी गेले होते. परत येताना त्यांनी एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतली. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालमोटारी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वेदांत आणि प्रज्वल दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
 
या घटनेनंतर संपूर्ण सज्जनगड परिसरात शोककळा पसरली आहे. दोघेही पहिलीपासून एकाच वर्गात शिकणारे मित्र होते. त्यांचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्याने गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. स्थानिक पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
 

Related Articles