पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा   

बुलडाणा : पोलिसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत बीएनएस २९६, ३५२ व पोलीस अधिनियम १९२२ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आज (सोमवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलडाणा येथे कार्यकर्ता आभार मेळावा होत आहे, त्याच्या पूर्वसंध्येला  गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
 
एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम खाते जगात नाही, असे गायकवाड म्हणाले होते. गायकवाड यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गायकवाड यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी तंबी दिली होती. त्यानंतर आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्ह्यानंतर माफीनामा

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागितली आहे. माझा हेतू पोलिसांचे धैर्य खचवण्याचा तसेच  त्यांच्या धाडसाचा आणि पराक्रमाचा अपमान करण्याचा नव्हता. पण मला जे अनुभव आले, ते मी त्या ठिकाणी मांडले. माझ्या शब्दामुळे महाराष्ट्रातल्या पोलिसांची किंवा महाराष्ट्र सरकारची नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो; पण मी जे काही वक्तव्य केलं ते अनुभवले आहे. माझ्या परिवारासोबत तसे झाले आहे, असे गायकवाड म्हणाले.
 

Related Articles