बेकायदेशीर वास्तव्य करणारे एक हजारांहून अधिक ताब्यात   

अहमदाबाद, सुरतमध्ये कारवाई

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद आणि सुरतमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या एक हजारांहून अधिक बांगलादेशी स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना लवकरच देशाबाहेर काढण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी सांगितले.अहमदाबादमध्ये ८९० आणि सुरतमध्ये १३४ बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. गुजरात पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे, असेही संघवी म्हणाले.
 
गुजरातमध्ये बेकायदा वास्तव्य करणार्‍यांनी स्वतःहून पोलिसांना शरण यावे. अन्यथा, त्यांना शोधून काढले जाईल आणि देशाबाहेर काढले जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला. यासोबतच, अशा व्यक्तींना ज्यांनी आश्रय दिला, त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, असेही सिंघवी यांनी सांगितले. अहमदाबाद आणि सुरतमध्ये एक हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी करताना बनावट कागदपत्रे बनवली. त्याआधारे, देशाच्या विविध भागात वास्तव्य करत ते गुजरातमध्ये आले. यातील अनेक जण अमली पदार्थमध्ये गुंतलले आहेत, असेही ते म्हणाले. 
 
अलीकडेच अटक केलेल्या चार बांगलादेशींपैकी दोघे ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते, हे स्पष्ट झाले आहे.  घुसखोरांसाठी बनावट कागदपत्रे तयार करुन देणार्‍यांवरदेखील कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सिंघवी यांनी दिला आहे. या सर्वांना बांगलादेशाकडे सोपविण्यासंदर्भाती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडली जाईल, असेही ते म्हणाले.गुजरातमधील बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना गुजरात सोडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. राज्यात इतर देशांचे नागरिक बेकायदेशीरपणे राहत असतील तर त्यांचाही शोध घेतला जात आहे, असेही संघवी म्हणाले.

Related Articles