महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा   

अजित पवार यांचे मत

पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक देखील होते. भाषेवरचे प्रभुत्व आणि विचारांची मांडणी याव्दारे त्यांनी समस्त महाराष्ट्राला खिळवून ठेवले होते. वाचनाचा पाया पक्का असल्यास आपली विचारांवरची निष्ठा कायम राहून आपल्या भूमिकेवर ठाम राहता येते. महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ साहित्यिक सांस्कृतिक वारसा लाभला आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.  
 
लोकसंवाद प्रकाशनातर्फे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मर्या. पुणेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या नर्मविनोदी भाषणांचे संकलन असलेल्या ’ऐकलंत का?’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 
 
रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, जेष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे, शंकरभाऊ मांडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, लेखक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मर्या. पुणेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, दिलीप मोहिते-पाटील, रमेश ढमाले, अशोक पवार, सुरेश घुले, विजय कोलते, चंद्रकांत मोकाटे, स्वप्नील ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.  
 
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, विविध राजकीय पक्षांमध्ये काम करताना आणि विचारधारा पुढे नेताना पुस्तकेच आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. सुनील चांदेरे यांच्या ’ऐकलंत का?’ या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ गंमतीशीर किस्से सांगितलेले नसून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा आलेखच त्यांनी मांडला आहे. या पुस्तकात माझ्यावर बेतलेले काही प्रसंग देखील मांडण्यात आले असून माझ्या राजकीय जीवनाचा प्रारंभीचा काळ, भाषण करताना धडधडणारी माझी छाती आणि लटपटणारे पाय या सगळ्या गोष्टी हे पुस्तक वाचताना मला पुन्हा एकदा आठवल्या. पूर्वीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दोघांच्या भूमिका या वेगवेगळ्या असल्या तरी आपलेपणा, ओलावा आणि जवळीक असायची. अलीकडे हे चित्र फार कमी पहायला मिळते. राजकारण हे सेवा करण्याचे एक माध्यम आणि समाज परिवर्तनाचे साधन आहे, हे सूत्र मानून राजकारणात प्रवेश करणारे फार कमी लोक राहिले आहेत. ज्ञान, अनुभव आणि वक्तृत्व असले म्हणजे तुमचे भाषण चांगले होते, असे नाही. तर ज्या व्यक्तीविषयी आपण बोलत असतो, त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात कणव, तळमळ, प्रेम आणि आपलेपणा असेल, तरच ते भाषण भावस्पर्शी आणि मनाचा ठाव घेणारे होते. 
 
मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन! 
 
विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प समजून घेताना असे पुस्तक लिहिले होते. आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर पुस्तक लेखनाचे महत्त्व ओळखून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ’मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन!’ या विषयावर पुस्तक लिहायला सांगणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगताच सभागृहात हास्याचे कारंजे फुलले. 

Related Articles