दहशतवादी?... ते तर स्वातंत्र्यसैनिक!   

इशाक डार यांची विखारी भूमिका

इस्लामाबाद : जम्मू -काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत ते तर स्वातंत्र्यसैनिक, असे आगीत तेल ओतणारे वक्तव्य पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी केले. 
 
पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर डार यांनी हे विधान केले आहे. इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना डार म्हणाले, पहलगाममध्ये हल्ला करणारे ते  स्वातंत्र्यसैनिक असू शकतात, आपण त्यांचे आभारी असले पाहिजे. जर भारताकडे या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे असतील तर त्यांनी ते जगासमोर सादर करावेत. मला वाटते भारत त्यांच्या अपयशासाठी आणि त्यांच्या देशांतर्गत राजकारणासाठी पाकिस्तानला दोष देत आहेत. भारताने अशा घटनांसाठी पाकिस्तानवर वारंवार आरोप केले आहेत. यावेळीही भारताने तोच खेळ खेळला आहे. 
 
भारताच्या वाढत्या आक्रमकतेबाबत ते म्हणाले, भारताने पाकिस्तानविरोधात कोणतेही पाऊल उचलले तर पाकिस्तान त्याला उत्तर द्यायला तयार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता मी बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे माझे दौरे रद्द केले आहेत, जेणेकरून आम्ही राजनैतिक प्रतिसाद तयार करू शकू. 
 
सिंधु नदी करारावर डार म्हणाले, पाकिस्तानच्या २४ कोटी नागरिकांंना पाण्याची गरज आहे, तुम्ही ते थांबवू शकत नाही. हे युद्धाचे कृत्य मानले जाईल. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्हीही त्याला योग्य प्रत्युत्तर देऊ, अशी पोकळ धमकीही त्यांनी दिली. दरम्यान, पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात संतापाचे वातावरण आहे. जगभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. सुरुवातीला पाकिस्ताननेही या घटनेचा निषेध करून या हल्ल्यामागे आपला हात नसल्याचे म्हटले होते. मात्र, पाकिस्तानचे खरे रूप जगासमोर आले आहे. 
 

Related Articles