संकर्षण कर्‍हाडे यांना द. मा. मिरासदार पुरस्कार जाहीर   

पुणे : प्रसिद्ध ग्रामीण कथा लेखक द. मा. मिरासदार यांच्या जन्मदिनानिमित्त गेल्या दोन वर्षांपासून द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा ’द. मा. मिरासदार पुरस्कार’ यंदा चतुरस्त्र अभिनेते आणि कवी संकर्षण कर्‍हाडे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे रवींद्र मंकणी आणि हरी मिरासदार यांनी दिली. 
 
प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते येत्या रविवारी सायंकाळी ६ वाजता राजवाडे सभागृह, भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. १४ एप्रिल हा द. मा. मिरासदार यांचा जन्मदिवस आहे. द. मा. मिरासदार हे कथालेखक, चित्रपटकथा व संवाद लेखक, कथाकथनकार होते. लोकप्रिय प्राध्यापकही होते. अनेक विविध सामाजिक आणि कलाक्षेत्रातील उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्याशी संबंधित असलेल्या क्षेत्रात त्यांचा वारसा पुढे नेणार्‍या तरुण कलाकारास द. मा. मिरासदारांच्या नावाने देण्यात येतो.

Related Articles