डॉ. तारा भवाळकर यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार   

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा जीवनसाधना गौरव पुरस्कार ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ.तारा भवाळकर यांना जाहीर झाला आहे. मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
भारती विद्यापीठाचा ३० वा स्थापना दिन समारंभ शनिवार  दि. २६  एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, धनकवडी येथे साजरा होणार आहे. या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा प्रमुख अतिथी आहेत. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अमिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम.एस. सगरे, डॉ. के.डी. जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी ही माहिती दिली.
 
डॉ. सावजी म्हणाले, गेल्या ६० वर्षांत भारती विद्यापीठाने देशाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात दिलेले योगदान मोलाचे आहे. देशभर शैक्षणिक संकुले असणारे, सर्व विद्याशाखांचे शिक्षण देणारे, ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा मिलाफ असणारे, महानगरांबरोबरच ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण केंद्रे उभी करून तेथील घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे, स्त्रियांच्या  शिक्षणासाठी पुढाकार घेणारे एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ म्हणून भारती विद्यापीठाचा नावलौकिक जगभर आहे.

Related Articles