वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...   

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरूवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर’ विमान कोसळून विमानातील २४१ जणांसह एकूण २९० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या विमान अपघातात पायल खाटीक नावाच्या एका मुलीचाही मृत्यू झाला आहे.
 
पायल खाटीक ही मूळ राजस्तानची. गुजरातमधील हिम्मतनगर येथे ती कुटुंबासोबत वास्तव्यास होती. वडील सुरेशभाई खाटीक यांनी रिक्षा चालवून मोठ्या कष्टाने तिला शिक्षण दिले. ती एका खासगी कंपनीत काम करत होती. तिच्या चांगल्या कामामुळे कंपनीने तिला लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला.  कंपनीच्या कामासाठी लंडनला जाणार्‍या पायलचा हा पहिलाच विमान प्रवास अखेरचा ठरला. पायल अहमदाबादहून लंडनला जात असलेल्या विमानाला अपघात झाला अन् पायलच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
   
जाण्यापूर्वी पायलने वडिलांशी संवाद साधला होता. पप्पा, काळजी करू नका, मी सांभाळून जाईन, पहिल्यांदाच विमानात बसलीय; परंतु सर्व ठीक असेल असे ती म्हणाली होती. तिला विमानतळावर सोडण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य गेले होते. पायलनेही विमानात बसल्यावर व्हिडिओ कॉल केला होता; परंतु जेव्हा विमान दुर्घटना कळली, तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीन हादरली. तिच्या आईने हांबरडा फोडला. तर वडीलही घाय मोकलून रडत होते.

Related Articles