कर्जाचा व्याजदर कमी होणार?   

वृत्तवेध 

रिझर्व बँक २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेपो दरात १२५-१५० बेसिस पॉइंट्स कपात करू शकते. स्टेट बँकेच्या नवीन संशोधन अहवालानुसार मार्च २०२५ पर्यंत ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित महागाई दर ३.३४ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. ती गेल्या ६७ महिन्यांतील सर्वात कमी पातळी असेल. या परिस्थितीमुळे रिझर्व बँक व्याजदर कमी करू शकते.

रेपो दरात कपात

फेब्रुवारी आणि एप्रिल २०२५ मध्ये आधीच ०.५० टक्के कपात करण्यात आली आहे. जून आणि ऑगस्ट २०२५ मध्ये आणखी ७५ बेसिस पॉइंट्सची कपात शक्य आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसर्‍या सहामाहीत (ऑक्टोबर २०२५-मार्च २०२६) अतिरिक्त ०.५० टक्के कपात अपेक्षित आहे. मार्च २०२६ पर्यंत रेपो दर पाच ते सव्वा पाच टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. तो रिझर्व बँकेच्या ५.६५ टक्क्यांच्या तटस्थ दरापेक्षा कमी असेल.

महागाई दराचा कल

२०२५-२६ च्या पहिल्या तिमाही (एप्रिल-जून)मध्ये महागाई दर तीन टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. अन्नधान्याच्या किमतींमध्ये कोणताही मोठा धक्का न बसल्यास या आर्थिक वर्षामध्ये सरासरी किरकोळ महागाई दर ३.७ ते ३.८ टक्के राहू शकतो.

बँक ठेवींच्या दरांवर परिणाम

* व्याजदरात कपात केल्यास मुदत ठेवींवरील व्याजदर सुमारे एक टक्क्याने कमी होऊ शकतात.
* ठेवींपेक्षा कर्जवाढ जलद असल्याने बँकिंग क्षेत्राच्या कर्ज-ठेवीतील तफावत वाढून एनआयएम (निव्वळ व्याज मार्जिन)वर दबाव येऊ शकतो.
* स्टेट बँकेच्या अहवालानुसार भारतातील महागाई दर नियंत्रणात आहे. आर्थिक वाढ स्थिर आहे आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक प्रमुख व्याजदरांमध्ये मोठी कपात करू शकते. यामुळे कर्ज घेणे स्वस्त होऊ शकते; परंतु बँक ठेवींवरील व्याजदेखील कमी होऊ शकते.

Related Articles