बाळगोपाळांंसाठी पुस्तक जत्रा   

पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लागावी, इतिहास, कला, साहित्य व संस्कृतीची माहिती व्हावी आणि लेखन-आकलन कौशल्य वाढावे, या उद्देशाने पुणे बाल पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जत्रा २२ ते २५ मे या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच, होणार आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते.
 
पांडे म्हणाले, पुस्तक जत्रेत बाळगोपाळांसमवेत पालक आणि शिक्षकांसाठीही नावीन्यपूर्ण कार्यक्रम, उपक्रम, परिसंवाद व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. खाऊगल्लीत मुलांना खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे, राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने बाल पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.  या जत्रेत बालगोपाळांसाठी विमान विज्ञान ही अनोखी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ’आपले अंगण’ उपक्रमात मुलांना देशी खेळाची धमाल मस्ती अनुभवायला मिळणार आहे. सागरगोट्या, विटी-दांडू, भोवरा, लगोरी, दोरीवरच्या उड्या, तळ्यात-मळ्यात, टायर रेस हे अंगणातले खेळ मुलांना खेळता येणार आहेत. ’मावळा खेळ’ अनुभवण्याची संधी बालगोपाळांना मिळणार आहे. या मैदानी खेळातून इतिहासाचा जागर होणार आहे. असेही राजेश पांडे यांनी सांगितले. 

बाल पुस्तक जत्रेतील कार्यक्रम 

मराठी बाल आणि कुमार साहित्याचे पुस्तक प्रदर्शनही होणार आहे. या जत्रेत किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बाल साहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, चिंटू तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ आणि प्रशिक्षण असे नावीन्यपूर्ण उपक्रम पूर्णपणे मोफत राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या मुलांसमवेत पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट देऊन साहित्य संस्कृतीचा अभिनव मेळा अनुभवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा,’ असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.
 

Related Articles