पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी   

वॉर्सा : पोलंडच्या अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह नेते कॅरोल नॉरोकी यांनी विजय मिळवला. नौरोकी यांना ५०.८९ टक्के मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी वॉर्साचे महापौर राफल ट्राझास्कोव्स्की यांना ४९.११ टक्के मते मिळाली.
 
पोलिश राजकीय व्यवस्थेतील बहुतेक दैनंदिन सत्ता संसदेने निवडलेल्या पंतप्रधानावर अवलंबून असते. तथापि, अध्यक्षांची भूमिका केवळ औपचारिक नसते. परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडण्याचा आणि कायद्यावर व्हेटो करण्याचा अधिकार या पदाकडे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नौरोकी यांना पाठिंबा दिला होता. नौरोकी हे आंद्रेज डुडा यांची जागा घेतील. तथापि, आंद्रेज डुडा यांचा कार्यकाळ ६ ऑगस्ट रोजी संपणार आहे.  
 
रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या एका सुरुवातीच्या मतदानोत्तर कौलांमध्ये ट्राझास्कोव्स्की विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून आले; परंतु काही तासांनंतर अपडेटेड मतदानाने चित्र पालटले. निकालावरून असे दिसून येते की, पोलंड त्याच्या नवीन नेत्याच्या नेतृत्वाखाली अधिक प्रगतीकडे वाटचाल करेल. 
 
दरम्यान, पोलंडच्या अध्यक्षीय निवडणुकीत रूढीवादी नौरोकी यांचा विजय रशिया-युक्रेन युद्धावर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकतो. नौरोकी हे उजव्या विचारसरणीच्या ’लॉ अँड जस्टिस’ पक्षाच्या जवळचे मानले जातात. त्यांच्या निवडणूक प्रचारात त्यांनी पोलंडच्या युक्रेनबद्दलच्या धोरणाबाबत अनेक निर्णायक संकेत दिले. 
 

Related Articles