खराडी- शिवणे रस्त्यासाठी भूसंपादनाला वेग येणार   

पुणे: वडगाव शेरीतील नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे, परंतु वाहतूक कोंडीत येथील नागरिकांचा श्वास कोंडलेलाच आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून नदीपात्रातील खराडी ते शिवणे रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले असून हा रस्ता गेल्या १३ वर्षांपासून केवळ कागदावरच तयार झाला आहे, पंरतु प्रत्यक्षात मात्र अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करायची असल्यास या रस्त्याचे काम मार्गी लागावे म्हणून अ वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाहणी केली. 
 
रस्त्याच्या पाहणीरदम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या कनिज सुखरानी, सुरेंद्र पठारे  आदी  उपस्थित होते. वडगावशेरी मतदारसंघात रस्ते सुधारणा, रुंदीकरण, नवीन रस्ते जोडणी, भुयारी मार्ग  अशा विविध पायाभूत सुविधा व रस्त्यांबाबत सुरू असलेल्या विकासकामांना वेग देण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी (दि. २६) पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांसमवेत पाहणी दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. दौर्‍यात प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्यांची रखडलेली किंवा तांत्रिक अडचणीत असलेली कामे मार्गी लागावीत, यासाठी अधिकार्‍यांना तातडीच्या सूचना दिल्या.
 
येरवडा ते खराडी या दरम्यान वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकल्पातील खराडी ते मुंढवा पुल दरम्यान रस्ता झाला आहे. पण, पुढे वडगाव शेरी ते येरवडा हा रस्ता भुसंपादन आणि तांत्रिक अडचणीत अडकला आहे. 
 
नदीपात्रातील रस्ता पुर्ण केल्यास खराडी ते येरवडा दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. परंतु या रस्त्याच्या कामाला अनेकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. जवळपास तेरा वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू आहे. आज अखेर या रस्त्याचे पन्नास टक्के भुसंपादन झाले आहे. उर्वरीत ५० टक्के भुसंपादनासाठी जागा मालकांना नोटीस देण्यात आल्या आहे. या रस्त्याच्या तीसर्‍या टप्प्यातील खराडी ते संगमवाडी या ११.५ किं.मी रस्त्यापैकी जवळपास ६ किं.मी जागेचे भुसंपादनाचे झाले आहे. खराडी गाव ते मुंढवा पुल दरम्यान रस्ता पुर्ण होऊन. वाहतूकीसाठी खुला झाला आहे. उर्वरीत संगमवाडी ते गुंजन चौक(४ किं.मी), गुंजन चौकामध्ये (५०० मी) आणि वडगावशेरी -खराडी या भागातील (१ किं.मी) जागेचे भुसंपादन बाकी आहे. भूसंपादन होत नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे.
 
पाहणीतील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे
 
गुंजन चौक ते मस्जिद व दफनभूमी शेजारील मेट्रो मार्गाखाली कल्याणीनगरकडे जाणार्‍या प्रस्तावित रस्त्याची स्थिती, गुंजन चौक ते विमानतळ रस्त्यावर अंडरपास निर्माण करण्याबाबतची शक्यता व अंमलबजावणी, मुळीक निवासस्थान ते वडगावशेरी गाव- जुना मुंढवा रस्त्यापर्यंत रुंदीकरण व विस्तारीकरण, बेग नगर स. नं. २२ मधून खराडी-शिवणे रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा जोड रस्ता, बोल्होबा चौक ते पुणे मनपा हद्दीपर्यंतच्या रस्त्याची बांधणी व सुसज्जिकरण, ग्रँड रोड ते नगर रस्ता (जकात नाका) जोडणार्‍या रस्त्यावरील पश्चिम बाजूच्या मिळकतधारकांशी चर्चा करून आवश्यक भूसंपादनासंबंधी उपाययोजना, डीपी रोड २०५ अंतर्गत लोहगाव-वाघोली जोडणारा नवीन रस्ता (स. नं. १२३, १२४), जकात नाका-भाजी मंडई-तालीम मनपा शाळा-मैफील इस्टेट पर्यंतचा रस्ता, खराडी पोलीस स्टेशन ते जनक बाबा दर्गा चौक दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण आदी.
 
नगर रस्त्यासह खराडी-शिवणे रस्त्याची पाहणी केली, हा रस्ता अर्धवट पडून आहे. या रस्त्यासाठी पाच ठिकाणांवरील भूसंपादन करणे आवश्यक आहे. या रस्त्याचे काम मार्घी लागवण्यासाठी जागा मालकांशी संवाद साधला जाणार आहे. त्यांना मोबादला कोणत्या स्वरुपात हवा आहे, हे जाणून घेतले जाईल. भुसंपादनाला वेग दिला जाऊन या रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल.
 
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका. 

Related Articles